ठाणे – ज्येष्ठांना अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय मदतीस नकार देणे हा ‘दखलपात्र गुन्हा’ मानला जातो असे माहिती ॲड प्रमोद ढोकले यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. २००७ च्या ‘माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा’नुसार, अत्याचार करणाऱ्यांना तीन महिने कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार दिनानिमित्त ठाणे नॉर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ॲड. प्रमोद ढोकले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ॲड. ढोकले हे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ आणि फेसकॉमचे कायदेविषयक सल्लागार म्हणुन कार्यरत आहेत. या कार्यक्रमावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अत्याचाराची व्याख्या, कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधक कायदे यांची सखोल माहिती उपस्थितांना दिली.

ज्येष्ठ नागरिकांचा ‘शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र, त्याविरोधात तक्रारी फारच कमी प्रमाणात नोंदवल्या जातात,’ असे त्यांनी सांगितले. अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय मदतीस नकार देणे हा ‘दखलपात्र गुन्हा’ मानला जातो. २००७ च्या ‘माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण कायदा’नुसार, अत्याचार करणाऱ्यांना तीन महिने कारावास आणि पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधानही करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत आणि आभार प्रदर्शन संघाचे अध्यक्ष सुरेश गुप्ते यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन हेमंत साने यांनी केले होते.

ज्येष्ठांना दिलेली संपत्ती पुन्हा मागण्याचा हक्क

जर ज्येष्ठांनी आपल्या नातेवाईकांना संपत्ती हक्काने दिली असेल आणि नंतर त्या व्यक्तींनी त्यांची उपेक्षा केली, तर ज्येष्ठ ती संपत्ती परत मागू शकतात, अशी महत्त्वाची माहितीही यावेळी ॲड ढोकले यांनी दिली. तसेच, संयुक्त राष्ट्रसंघ, केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्येष्ठ नागरिक धोरणांचेही त्यांनी सविस्तर विश्लेषण केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस आणि ज्येष्ठ संघटनेतील समन्वय गरजेचा

ज्येष्ठांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिस आणि ज्येष्ठ संघटनेतील समन्वय गरजेचा असून, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही यासाठी महत्त्वाचे आहे, असे ॲड. ढोकले यांनी नमूद केले. शाळा-महाविद्यालयांतून तरुण पिढीशी सुसंवाद वाढविण्याचे कार्यक्रम राबवावेत, अशी सूचना त्यांनी केली.