ठाणे : ठाण्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असताना, स्थानिक पातळीवर देखील शिवसेनेची विविध मार्गाने कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे. शुक्रवारी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सिताराम राणे यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून शिवाईनगर येथे बांधण्यात येणाऱ्या समाज भवनास विरोध केला आहे. शिवाईनगर भागात एकही उद्यान नाही. त्यामुळे याठिकाणी समाज भवना ऐवजी उद्यान बांधण्यात यावे अशी मागणी राणे यांनी केली आहे. तसेच समाज भवनाच्या नावाखाली जागा हडप केल्या जात आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवाईनगर येथे म्हाडा वसाहत आहे. सुमारे ४० वर्ष जुनी ही वसाहत आहे. येथील एका मोकळ्या जागेत म्हाडाने मलनि:स्सारण वाहिनीची टाकी बांधली होती. महापालिकेची मलनि:स्सारण वाहिनी असल्याने येथील टाकी १५ वर्षांपूर्वीच बंद झाली आहे. या टाकीजवळ मोकळी जागा आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या आमदार निधीतून या जागेत समाज भवन बांधण्याचा निर्णय घेतला होता. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी त्यांनी या जागेमध्ये भूमीपूजन केले होते. परंतु या समाज भवनाच्या निर्माणास भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सिताराम राणे यांनी विरोध दर्शविला आहे. म्हाडाच्या मंजूर आराखड्यात शिवाईनगरमधील गणेश नगर येथे ६ हजार ८० चौ. मीटर, शिवाई विद्यालयाशेजारील जागेत आठ हजार आणि दोन हजार चौ. मीटरचे दोन भूखंड, म्हाडा वसाहत येथील २ हजार ७०० चौ. मीटर आणि जयभवानी सोसायटी येथील ३६३ चौ. मीटरचा भूखंड असे एकूण १७ हजार चौ. मीटर पेक्षा जास्त जागा उद्यानासाठी आरक्षित होत्या. मात्र, काही चालाख राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याठिकाणी अनधिकृत झोपड्या वसवून समाज मंदिराच्या नावाखाली इमारती उभारल्या असा आरोप राणे यांनी केला.

हेही वाचा : शिंदे गटाचा ठाण्याचा उमेदवार कोण असणार? जितेंद्र आव्हाडांनी घेतलं मित्राचं नाव, म्हणाले…

आताच्या राजकारण्यांनी शिवाईनगरमधील जागा हडप केल्या आहेत. तिथे समाज भवन बांधून त्या जागा स्वत:कडे ठेवल्या आहेत. म्हाडा वसाहतीत देखील मंजूरी घेणे टाळत आमदारांनी समाज भवानाचे भूमीपूजन केले. शिवाईनगरच्या नागरिकांचा समाज भवन बांधण्यास विरोध आहे. येथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी उद्याने नाहीत. त्यामुळे येथे उद्यान झाले पाहिजे. नागरिकांचा टोकाचा विरोध असतानाही इमारत बांधल्यास आम्ही इमारत बांधण्याचा प्रयत्न हाणून पाडू असे राणे म्हणाले. ठाणे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारावरून भाजप आणि शिवसेनेकडून दावे केले जात आहे. शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये प्रताप सरनाईक यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. असे असताना दुसरीकडे भाजपकडून त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले जात आहे.