ठाणे : ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे. जोशी एंटरप्रायझेसचे बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके आणि त्यांच्या भागीदारांविरोधात पूनर्विकास प्रकल्पामध्ये फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. मे. जोशी एंटरप्रायझेसच्या माध्यमातून नौपाडा, चरई, पाचपाखाडी भागात ठिकठिकाणी जुन्या इमारतींच्या पूनर्विकासाची कामे हाती घेण्यात आले आहे. परंतु अनेक प्रकल्पाची कामे ठप्प असल्याच्या तक्रारी येत आहेत. कळके याच्याविरोधात यापूर्वी त्याच्या भागीदाराने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. कळके विरोधातील आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले असून याप्रकरणांचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहेत.

ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीचे भागीदार कौस्तुभ कळके यांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. कळके यांनी दोन भागीदारांना बाहेर काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केल्याचा आरोप कंपनीचे भागीदार सुनील लिमये यांनी केला होती. लिमये यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कौस्तुभ कळके याला अटक केली होती. या कंपनीने जुन्या ठाण्यामध्ये एकूण १६ मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांसोबत इमारत पुनर्विकासाचे करार केले होते. असे असले तरी अनेक प्रकल्पामध्ये कंपनीने तेथील रहिवाशांना मासिक घरभाडे दिलेले नाही. पूनर्विकास इमारतीत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांची परस्पर विक्री केल्याचेही प्रकार समोर आले आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी विनोद पाटील यांची चर्चा; छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या हालचाली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे पोलिसांनी कौस्तुभ कळके याला अटक केल्यानंतर आता पोलिसांकडे त्याच्या विरोधात तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. शनिवारी नौपाडा आणि पाचपाखाडी येथील पूनर्विकास प्रकल्पामध्ये फसवणूक झालेल्या गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात कळकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे कळके त्याचे भागीदार जयंती जैन, सुनील लिमये, कमिशा सिंह आणि सुंदरराज हेगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनर्बांधणीतून मिळणाऱ्या सदनिका परस्पर विक्री केल्याने तसेच मासिक घरभाडे दिले नसल्याचे तक्रारींत म्हटले आहे. कळके विरोधात आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणांचा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू आहे.