ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाणे शहरातील येऊरच्या बेकायदा बांधकामांचा मुद्दा गेले अनेक वर्षे गाजत असतानाच, या भागात बेकायदा बांधकाम करून उभारण्यात आलेल्या हाॅटेलचा शनिवारी शुभारंभ होणार होता. या बांधकामावरून पालिका प्रशासनावर गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यांवर टिका होत होती आणि नव्या हाॅटेलमुळे येऊरमध्ये धांगडधिंगा वाढणार असल्याची चर्चा होती. असे असतानाच, पालिकेने या बांधकामावर शनिवारी पोलिस बंदोबस्तात हातोडा मारला. त्यामुळे उद्घाटनाआधीच बेकायदा हाॅटेल भुईसपाट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे येथील येऊरच्या जंगलात गेल्या काही वर्षांपासून बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. या बांधकामांचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. प्रत्यक्षात मात्र त्यावर फारशी प्रभावीपणे कारवाई होताना दिसून येत नाही. त्याचबरोबर या परिसरात हाॅटेल उभारण्यात येत असून तिथे पार्ट्या केल्या जात आहेत. यामुळे शांतता क्षेत्र असलेल्या येऊर भागात रात्रीच्या वेळेत ध्वनी प्रदुषण होत असून त्याचा त्रास येथील वन्यजीव प्राण्यांवर होत आहे. रात्रीचा धांगडधिंगा थांबवा, अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांसह पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने केली जाते. असे असतानाच, या जंगलात यापुर्वी गोल्डन स्वान कंट्री या नावाचे हाॅटेल होते. या हाॅटेल ठिकाणी ४० × ५० चौरस फुटाचे क्षेत्रफळात बांधकाम करण्यात आले होते. त्यामध्ये टर्फ, हाॅटेल आणि इतर बांधकामे करण्यात आली होती. याठिकाणी गोल्डन स्वान कंट्री या हाॅटेल नावात बदल करून लेवल अप नावाचे हॉटेल सुरू करण्यात येणार होते. त्याचा शुभारंभ शनिवारी होणार होता.

दरम्यान, या बांधकामाबाबत तक्रारी येताच पालिकेने याठिकाणी जाऊन पाहाणी केली होती. त्यावेळी पालिकेच्या पथकाने बांधकाम परवानगीची कागदपत्रे दाखविण्यास सांगितले होते. मात्र, संबंधितांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नव्हती. यामुळे पालिकेने कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची संधी देऊनही संबंधितांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नव्हती. तसेच या बांधकामासाठी पालिकेकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती शहर विकास विभागाने अतिक्रमण विभागाला कळविले होते. त्यानुसार पालिकेच्या पथकाने शनिवारी पोलिस बंदोबस्तात हातोडा मारला. ही कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांच्या पथकाने केली. अंदाजे ४० × ५० चौरस फुटाचे लोखंडी अँगल्सच्या सहाय्याने केलेले अनधिकृत शेडचे बांधकाम काढण्यात आले.