कल्याण: डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील बेकायदा राधाई काॅम्पलेक्स प्रकरणी मानपाडा पोलिसांनी या प्रकरणातील विकासकासह त्यांच्या बरोबर विकास करारनामा करणारे, मूळ मालकाची जमीन हडप करणारे, राधाई इमारत उभारताना कल्याण डोंबिवली पालिकेची बनावट कागदपत्रे तयार करून, त्या आधारे दस्त नोंदणी करून घर खरेदीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी चौकशी करून तीन जणांवर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी आरोपपत्र दाखल केले.

मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दत्तात्रय गुंड यांनी याप्रकरणाचा मागील वर्षभरात तपास केला. सुमारे पाचशेहून अधिक पानांचे हे आरोपपत्र आहे. या आरोपपत्रात श्री स्वस्तिक होम्सचे मयुर रवींद्र भगत, विकास करारानामा करणारे ॲड. संजय विष्णु पाटील, सचिन विष्णु पाटील यांचा समावेश आहे. राधाई काॅम्पलेक्स या बेकायदा इमारतीची पालिकेची बनावट बांधकाम परवानगी ॲड. संजय विष्णु पाटील यांच्या नावावर आहे.नांदिवली पंचानंद येथील जयेश म्हात्रे आणि इतर दोन भावांच्या वडिलोपार्जित जमिनीवर स्वस्तिक होम्सचे मयुर भगत आणि इतरांनी बेकायदा इमारत उभारली. या बेकायदा इमारतीवर पालिकेकडून कारवाई होत नसल्याने जमीन मालक जयेश म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने गेल्यावर्षी या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पालिकेने ही इमारत जमीनदोस्त केली.

आपली वडिलोपार्जित जमीन दहशतीचा बळाचा अवलंब करून स्वस्तिक होम्सचे मयुर भगत, ॲड. संजय पाटील, सचिन पाटील यांनी ताब्यात घेतली. या जमिनीवर बेकायदा इमारत उभारली. ही इमारत उभारताना पालिका नगररचना विभागाच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार केल्या. त्या आधारे महारेराचा नोंदणी क्रमांक या इमारतीला मिळविला. या इमारतीमधील सदनिक खरेदीदारांना दस्त नोंदणीकृत पध्दतीने विकून घर खरेदीदारांची फसवणूक केली म्हणून जयेश म्हात्रे यांनी पालिका, शासन आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२०, ४६६ ते ४६८, ४७१ प्रमाणे वर्षभरात चौकशी करून आरोपपत्र तयार केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे आरोपपत्रात

विकासक मयुर भगत यांंनी राधाई या बेकायदा इमारतीचे बांधकाम केले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या सन २०२० ते २०२१ या कालावधीतील बनावट बांधकाम परवानग्या वापरून त्यामधील सदनिका घर खरेदीदारांना विकल्या. राधाई इमारत बेकायदा आहे हे माहिती असुनही सचिन पाटील यांनी या इमारतीमधील सदनिका सुनील सोरटे यांना विक्री करून त्यांची फसवणूक केली. राधाई जमिनीची प्रकरणे न्यायालयात आहेत. ही जमीन वाद्गग्रस्त आहे हे माहिती असुनही या जागेवर अनधिकृत इमारत उभारून त्यामधील सदनिका घर खरेदीदारांना विकून ॲड. संजय पाटील, सचिन पाटील आणि विकासक भगत यांनी फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केली. त्यामुळे या तिघांवर दोषारोप लावण्यात आले आहेत, असे आरोपपत्रात म्हटले आहे.बनावट बांधकाम परवानगीप्रकरणी जमीन मालकाने बार कौन्सिल गोवा आणि महाराष्ट्रकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.