Viral Video of Cutting Cake with Sword: आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने मित्रांसोबत साजरा करावा म्हणून टिटवाळा येथील गणेशवाडी भागात राहणाऱ्या एका २८ वर्षाच्या तरूणाने गेल्या आठवड्यात सार्वजनिक ठिकाणी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास धारदार तलवारीने केक कापून मित्रांंसोबत आनंदोत्सव केला. या तरूणाची तलवारीने केक कापण्याची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी या तरूणाचा शोध घेऊन त्याच्या विरुध्द मनाई हुकूम आणि शस्त्र प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल केला.
केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करणाऱ्या, केक कापल्यानंतर रिव्हाॅल्व्हर, बंदुकीने हवेत गोळीबार करून जन्मदिनाचा आनंद लुटणाऱ्या इसमांविरुध्द कल्याण, डोंबिवलीतील पोलिसांनी यापूर्वी गुन्हे दाखल केले आहेत. हे माहिती असुनही टिटवाळ्यात एका अतिउत्साही तरूणाने आपला वाढदिवस साजरा करताना तलवारीचा वापर केला आणि पोलिसांच्या कारवाईत अडकला.
राहुल जटाशंकर श्रीवास्तव (२८) असे तलवारीने केक कापणाऱ्या आणि गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो टिटवाळा गणेशवाडी भागातील वालाराम वाटिका इमारतीच्या मागील भागातील यादव चाळीत कुटुंबीयांसह राहतो. पोलिसांकडून मिळालेली माहिती, अशी की राहुल श्रीवास्तव याचा एक मे रोजी वाढदिवस होता. त्याच्या मित्रपरिवाराने त्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याची तयारी केली. राहुलचे यादव चाळीत नाव आहे. केकची तयारी करण्यात आली.
एक मे रोजी रात्री १२ वाजता सार्वजनिक ठिकाणी राहुल आणि त्याच्या मित्रांनी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवसाचा केक कापण्याची तयारी केली.केक कापण्यासाठी छोटी सुरी ऐवजी तलवारीचा वापर करण्याचे ठरले. त्यासाठी एक तलवार मिळविण्यात राहुल आणि त्याच्या मित्रांना यश आले. २८ इंच लांब असलेली धारदार लोखंडी पाते असलेली तलवार केक कापण्यासाठी सज्ज करण्यात आली.
व्हायरल व्हिडीओ
रात्रीचा बारा ठोका पडताच जन्मदिन साजरा करण्याच्या आनंदात असलेल्या राहुलच्या हातात मित्रांनी धारदार तलवार दिली. आपण जणू शूर पराक्रम करतोय अशा थाटात राहुलने तलवार फिरवली आणि त्यानंतर तलवारीच्या साहाय्याने मित्रांच्या उपस्थितीत केक कापला.हा तलवारीने केक कापण्याचा कार्यक्रम मित्रांनी मोबाईलमध्ये कैद केला. राहुलच्या प्रसिध्दीसाठी समाज माध्यमांमध्ये प्रसारित केला. समाज माध्यमांतील ही दृश्यध्वनी चित्रफित टिटवाळा पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी राहुल श्रीवास्तवचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी तलवारीचा वापर केला म्हणून मनाई हुूकुमाचा आदेश मोडला आणि सार्वजनिक ठिकाणी शस्त्राचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.