कल्याण – टिटवाळा-मांडा गाव हद्दीतून गेलेल्या मुंबई-बडोदा महामार्गालगत भूमाफियांनी अडगळीच्या जागेत बेकायदा चाळींची उभारणी करण्यासाठी दहाहून अधिक जोत्यांची उभारणी केली होती. महामार्ग गावाजवळून जात असल्याने या भागातील मुख्य वर्दळीच्या जागा बेकायदा बांधकामे करून त्या हडप करण्याचा माफियांचा डाव होता, ही बाब कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने बडोदा महामार्गालगतची जोते आणि चाळींची बांधकामे जमीनदोस्त केली.

टिटवाळा मांडा भागातून बडोदा-मुंबई महामार्ग जात आहे. या महामार्गामुळे टिटवाळा, खडवली भागातील जमिनींचे भाव वधारले आहेत. त्यामुळे या महामार्गालगतच्या सरकारी वन खात्याच्या जमिनी हडप करून तेथे बेकायदा चाळी उभारणीसाठी या भागातील भूमाफिया सरसावले आहेत. महामार्ग सुरू झाल्यानंतर अशाप्रकारची बांधकामे करता येणार नाहीत. आता पावसाळा सुरू आहे. मुसळधार पावसात पालिका, सरकारी अधिकाऱ्यांचे आपल्याकडे लक्ष नाही, असा समज करून घेऊन भूमाफियांनी टिटवाळा मांडा भागातील बल्याणी दफनभूमी परिसरातील मोकळ्या जागांवर शनिवार, रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशी दिवसरात्र कामे करून बेकायदा चाळी, व्यापारी गाळे सुरू करण्यासाठी बेकायदा बांधकामांची उभारणी केली होती.

अशाप्रकारे जागा हडप करून तेथे हॉटेल, ढाबा, चहापानाच्या टपऱ्या सुरू करण्याची भूमाफियांची आखणी होती. पण अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना मुंबई बडोदा महामार्गालगत बल्याणी दफनभूमी भागात भूमाफियांनी माळरान जमिनींवर, खाचर जमिनीत भराव करून जोत्यांची बेकायदा बांधकामे केली आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीची खात्री केल्यावर अशाप्रकारे बेकायदा बांधकामे दोन दिवसात बांधण्यात आली आहेत, अशी खात्रीलायक माहिती साहाय्यक आयुक्तांना मिळाली.

संबंधित बांधकामांच्या ठिकाणी जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करून त्या ठिकाणाहून जेसीबी आणि तोडकाम पथकाला नेऊन बल्याणी भागातील बडोदा महामार्गालगतची सर्व बेकायदा बांधकामे अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली. भूमाफियांचे तीस ते चाळीस लाख रूपयांचे नुकसान या तोडकामाच्या माध्यमातून करण्यात आले, अशी माहिती तोडकाम पथकाने दिली. ही कारवाई सुरू असताना एकही भूमाफिया कारवाई रोखण्यासाठी पुढे आला नाही.

टिटवाळा परिसरातून मुंबई बडोदा महामार्ग गेला आहे. या महामार्गालगतच्या जमिनींना चांगले भाव आले आहेत. भूमाफिया या महामार्गालगत बेकायदा बांधकामे करण्यासाठी हालचाली करत आहेत. अशी कोणत्याही प्रकारची बांधकामे या महामार्गालगत आणि टिटवाळा परिसरात होऊ दिली जाणार नाहीत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


पावसाळा सुरू असला तरी अ प्रभाग हद्दीत बेकायदा बांधकामांविरुध्दची मोहीम ही सुरूच राहणार आहे. या कारवाईत खंड पडणार नाही, असे साहाय्यक आयुक्त पाटील यांनी सांगितले.