कल्याण – टिटवाळ्यातील भूमाफियांच्या मागे मागील आठ महिन्यांपासून लागलेला पालिकेच्या तोडकामाचा ससेमिरा सुटण्याची शक्यता दिसत नाही. उन्हाळ्यात बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आल्यामुळे आपण पावसाळ्यात त्या जागी पुन्हा बेकायदा चाळींची बांधकामे करू असा विचार करून असलेल्या भूमाफियांच्या मनसुब्यांवर अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी हातोड्याचे घाव घालण्यास सुरूवात केली आहे. शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असुनही पाटील यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने उंभार्ली रस्ता, बल्याणी भागातील २८ जोते आणि दोन बेकायदा चाळी भुईसपाट केल्या.

शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पालिका अधिकारी प्रभागात फिरकत नाहीत, असा गैरसमज भूमाफियांचा असल्याने शुक्रवारी रात्री काही भूमाफिया बेकायदा चाळी, जोती बांधण्याची कामे सुरू करतात आणि सोमवारी सकाळपर्यंत ही कामे घाईने पूर्ण करून ठेवतात. या नव्या बांधकामांना सफेद रंग मारून ही बांधकामे जुनी आहेत असा देखावा पालिका अधिकाऱ्यांसमोर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

टिटवाळ्यातील भूमाफियांच्या सर्व क्लृप्त्या माहिती असल्याने साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आता शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असुनही प्रभागात भ्रमंती करून सुट्टीच्या दोन दिवसात नव्याने उभी राहिलेल्या बेकायदा चाळी, जोत्यांची माहिती घेऊन ती तोडकाम पथकाच्या साहाय्याने तात्काळ भुईसपाट करण्याचा सपाटा लावला आहे.

या बेकायदा चाळींमध्ये रहिवास सुरू झाल्यावर त्या बांधकामांवर कारवाई करणे पालिका पथकाला अवघड होते. त्यामुळे ही बांधकामे ओली असतानाच जेसीबी, तोडकाम पथकाच्या साहाय्याने भुईसपाट केली जात आहेत. बल्याणी, उंभार्ली रस्ता भागात भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारणीसाठी २८ जोत्यांची बांधकामे केली आहेत. दोन चाळींची बांधकामे पूर्ण केली आहेत अशी माहिती शनिवारी सकाळी साहाय्यक आयुक्त पाटील यांना समजली. त्यांनी तात्काळ दहा वाजण्याच्या दरम्यान ठेकेदाराचे कामगार, जेसीबी, आवश्यक तोडकाम पथक घेऊन बल्याणी गाठली आणि तेथील बेकायदा चाळी उभारणीसाठी बांधलेली जोत्यांची २८ बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केली.

या कामाच्या ठिकाणी आणलेल्या विटा, बांधकाम साहित्याची नासधूस केली. उंभार्ली रस्ता येथे बेकायदा चाळींची उभारणी करण्यात आली होती. ही बांधकामे रात्रीच्या वेळेत केली जात होती. दिवसा पालिका अधिकाऱ्यांना दिसेल म्हणून दिवसा ही कामे बंद ठेवली जात होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुसळधार पाऊस सुरू असुनही त्या पावसात जोत्या, चाळींची बांधकामे अ प्रभाग तोडकाम पथकाने जमीनदोस्त केली. पोलीस बंदोबस्त न घेता साहाय्यक आयुक्त पाटील ही कारवाई करत आहेत. या सततच्या कारवाईने टिटवाळा, बल्याणी, बनेली, उंभार्ली भागातील भूमाफिया आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आले आहेत. बहुतांशी भूमाफियांचा व्यवसाय बेकायदा चाळी उभारणे आणि त्यामधील खोल्या कमी किमतीत विक्री करणे हेच होते. ही सर्व व्यवस्था पाटील यांनी मोडीत काढली आहे.