उल्हासनगर: उल्हासनगरातील फर्निचर बाजारात एका जीर्ण धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फर्निचर बाजारातील माया हॉटेल शेजारी ही इमारत होती. या प्रकारामुळे धोकादायक इमारतींसह आसपास असणाऱ्या नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उल्हासनगरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. मात गेल्या काही दिवसांपासून कामगार सुरक्षेत हलगर्जी केल्याने काही मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगर शहरात गेल्या काही वर्षात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा बहुतांश धोकादायक इमारतींची यादी करून त्या रिकाम्या करण्याचे काम उल्हासनगर महापालिका प्रशासनाने केले होते. मात्र काही रिकाम्या इमारती या वेळीच न पडल्याने त्याचे काही भाग कोसळून नागरिकांचा मृत्यू किंवा ते जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही नागरिक याच धोकादायक इमारतीचा देखभाल दुरुस्तीचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न अनेकांच्या अंगलट आला आहे. अशीच एक घटना रविवारी उल्हासनगर शहरात समोर आली.
उल्हासनगर शहरातील फर्निचर बाजारात माया हॉटेलच्या शेजारी असलेल्या जीर्ण आणि धोकादायक अवस्थेतील इमारतीत रविवारी सायंकाळी पडझड झाली. या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून सज्जा कोसळून खाली काम करत असलेल्या एका कामगारावर आदळला. या दुर्घटनेत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत कामगाराचे नाव रावसाहेब नंदनवरे असे असून, ते या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसांपासून कार्यरत होते. घटनेच्या वेळी रावसाहेब आणि इतर काही कामगार अरुंद जागेत उभे राहून बांधकाम करत होते. त्याचवेळी अचानक वरून खिडकीचा मोठा सज्जा तुटून थेट रावसाहेब यांच्या डोक्यावर कोसळला. यानंतर तातडीने रावसाहेब यांना उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी माया हॉटेलचे मालक महेश साधवानी यांच्यावर रावसाहेब नंदनवरे यांच्या नातलगाने दिलेल्या तक्रारीनंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सुरक्षा साधने न पुरवता कामगारांना कामाला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ शहरात अशाच प्रकारे कामगाराच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर बदलापूर शहरातही अशीच एक घटना घडली होती.