पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचा अहवाल; १९ चौकांत प्रदूषणाचे प्रमाण अधिक
ठाणे : महापालिका क्षेत्रात सर्वाधिक वर्दळ असलेल्या १४ चौकांतील हवा मध्यम प्रदुषित, तर ५ चौकातील हवा प्रदूषित असल्याची बाब पालिका प्रदूषण नियंत्रण विभागाकडून करण्यात आलेल्या पाहाणीतून समोर आली आहे. यात बाळकुम, कॅसलमिल नाका, मुंब्रा फायर सेंट, रेतीबंदर आणि शीळफाटा या चौकांचा समावेश आहे, तर कॅडबरी चौकातील हवेची गुणवत्ता मात्र समाधानकारक असल्याचे पुढे आले आहे. करोना टाळेबंदी आणि निर्बंध शिथिलीकरणानंतर सर्वसामान्यांना रेल्वेच्या लोकलगाडय़ांचा प्रवास बंद होता. त्यामुळे नागरिक स्वत:च्या वाहनाने प्रवास करीत होते. यामुळेच शहरातील चौकांमध्ये हवा प्रदूषण वाढल्याचा निष्कर्षही प्रदूषण नियंत्रण विभागाने काढला आहे.
पालिका प्रदूषण नियंत्रण विभागाने २०२१ मध्ये शहरात केलेल्या पाहणीमध्ये शहरातील हवा प्रदूषितच असल्याचे दिसून आले. शहरात सर्वाधिक वर्दळीचे असे एकूण २० चौक आहेत. यापैकी १४ चौकांतील हवा मध्यम प्रदूषित असून त्या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० ते २०० इतका आहे, तर बाळकुम, कॅसल मिल नाका, मुंब्रा फायर सेंट, रेतीबंदर आणि शीळफाटा या पाच चौकांतील हवा प्रदूषित असल्याचे समोर आले असून या ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० ते २३० इतका आहे. करोना टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्यांना रेल्वे लोकलगाडय़ांचा प्रवास बंद होता. यामुळे नागरिकांना घर ते कार्यालयापर्यंतचा प्रवास करण्यासाठी रस्ते वाहतुकीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. परिणामी या काळात रस्त्यांवर वाहनांचा भार वाढला आणि यामुळे हवा धूलिकणात वाढ होऊन हवेची गुणवत्ता घसरली, असा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण विभागाने अहवालात मांडला आहे.
हवा गुणवत्ता निर्देशांक
० ते ५० चांगली
५१ ते १०० समाधानकारक
१०१ ते २०० मध्यम
२०१ ते ३०० प्रदूषित
३०१ ते ४०० अत्यंत प्रदूषित
मध्यम प्रदूषित
नितीन नाका, मुलुंड चेक नाका, किसननगर चेक नाका, शास्त्रीनगर नाका, उपवन बस डेपो, वाघबीळ नाका, गावदेवी नाका, विटावा नाका, कळवा शिवाजी महाराज चौक, कोर्ट नाका, एल.बी.टी. नाका, कापूरबावडी नाका, कोपरी प्रभाग समिती, कल्याण फाटा प्रदूषित बाळकुम, कॅसलमिल नाका, मुंब्रा फायर सेंट, रेतीबंदर आणि शीळफाटा