ठाणे – शहरात मागील दोन ते तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर, वातावरणात थंडावा देखील निर्माण झाला होता. परिणामी, आता सर्दी-खोकला असे संसर्गजन्य आजार पसरण्यास सुरुवात झाली आहे.शहरातील दवाखान्यांमध्ये सर्दी -खोकल्याने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

ठाणे शहरात सोमवार आणि मंगळवार रेड अलर्ट जारी करण्यात आले होते. त्यानुसार, शहरात रविवारी रात्री पासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले तर, अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. पावसाचे पाणी साचल्यामुळे त्याठिकाणी जंतू पसरत असून रोगराई पसरण्याची शक्यता असते. तर, दुसरीकडे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम देखील नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, श्वसनास त्रास होणे अशा आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण त्यांच्या घराजवळील दवाखान्यात गर्दी करत आहेत.

गेले काही आठवड्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे वातावरण देखली दमट होते. दुपारच्या वेळी उन्ह पडत होते. परंतू, अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मुसळधार पावसापूर्वी केवळ दररोज दवाखान्यात २५ ते ३० रुग्ण उपचारासाठी येत होती. परंतू, गेले तीन चार दिवसात दररोज ४० ते ५० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती ठाणे शहरातील कोपरी भागात असलेले डॉ. नंदकुमार ठाकूर यांनी दिली. यात, विशेषकरुन सर्दी – खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत असेही ते म्हणाले.

नागरिकांनी कशी काळजी घ्यावी

मुंबईसह, ठाणे शहरात तीन – चार दिवसापूर्वी मुसळधार पाऊल पडला. या पावसामुळे सध्या अनेर भागात दुषीत पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काही दिवस पाणी उकळून प्यावे तसेच सर्दी -खोकला जास्त असल्यास वाफ घ्यावी, घराबाहेर जाताना मुखपट्टीचा वापर केला पाहिजे, थंड पेय पिणे टाळावे आणि जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. या आजारांबाबत वेळीच सर्तकता बाळगली तर, पुढे डेंग्यू मलेरिया सारखे आजार रोखण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया शहरातील एका डॉक्टरांनी दिली.