लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: सातव्या वेतन आयोग लागू करताना शासनाप्रमाणेच वेतनश्रेणी आणि ग्रेड पे लागू करण्याची ठाणे महापालिकेतील लघुलेखकांची मागणी अखेर पालिका प्रशासनाने मान्य केली आहे. त्याचा फायदा पालिकेतील २३ लघुलेखकांना झाला असून त्यांच्या ग्रेड पे मध्ये शंभर रुपयांची वाढ झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. हा वेतन आयोग लागू करताना शासनाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. परंतु ठाणे महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी शासनाच्या वेतनश्रेणीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे शासनप्रमाणे वेतनश्रेणी लागू करू नये अशी भुमिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू झाला. असे असले तरी पालिकेतील लघुलेखकांची वेतनश्रेणी शासनाच्या वेतनश्रेणीपेक्षा कमी होती.

आणखी वाचा-अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाण्याचा ठणठणाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या लघुलेखकांना ९३००-३४८०० इतकी वेतनश्रेणी आणि ४३०० ग्रेड पे दिला जातो. तर, पालिकेतील लघुलेखकांना ९३००-३४८०० इतकी वेतनश्रेणी आणि ४२०० ग्रेड पे दिले जाते. त्यामुळे शासनाप्रमाणे वेतनश्रेणी निश्चित करून ग्रेड पे लागू करण्याची मागणी लघुलेखकांकडून होत होती. अखेर पालिकेने ही मागणी मान्य करून लघुलेखकांना शासनाप्रमाणे ४३०० ग्रेड पे लागू केला आहे. १ जून २००६ आणि त्यानंतर नियुक्त केलेल्या मराठी तसेच इंग्रजी लघुलेखकांना ही सुधारीत वेतनश्रेणी लागू होणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक पालिकेने काढले आहे.