ठाणे : तृणधान्यांचे योग्य प्रमाणात आहारात सेवन केल्यास त्यातून शरीराला उर्जा मिळेल. त्यामुळे संयम, सकारात्मकता आणि प्रसन्नता वाढेल, असे सांगत आयुर्वेद शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. उदय आणि डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी तृणधान्याचे फायदे सांगितले. हळूहळू आहारात तृणधान्याचे प्रमाण वाढवत न्यावे, त्यातून आपण आरोग्यपथावर पुन्हा येऊ. आपल्या शरीराला उर्जा मिळाल्याने त्याचे सकारात्मक फायदे दिसू लागतील, असेही डॉ. मधुरा यांनी स्पष्ट केले.

सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने निरनिराळे उपक्रम हाती घेतले आहेत. महापालिकेने त्याच जोडीने तृणधान्य वापराच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी व्यापक मोहीम आखली आहे. त्याचे नियोजन महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग करत असून त्यात त्यांना शिक्षण, पर्यावरण आणि समाज विकास हे विभाग सहकार्य करणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ करणारे उद्घाटनाचे व्याख्यान बुधवारी सायंकाळी महापालिका भवनातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात झाले. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना तृणधान्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी, या व्याख्यानाद्वारे आयुर्वेद शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. उदय कुलकर्णी आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे गाव, कोपर पूर्व हरितपट्ट्यातील बांधकामांना बेकायदा नळजोडण्या

वाढती लोकसंख्या, शाश्वत विकास, छोट्या शहरांना आधार, पाण्याचा कमी वापर, जैवविविधतेचे संवर्धन या दृष्टींनी हे वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढते आजार, स्थूलता आदींवर मात करणे त्यांचा प्रभाव रोखणे यासाठी तृणधान्य वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे डॉ. मधुरा कुलकर्णी यांनी सांगितले. तृणधान्यांची निवड, त्याचा वापर, त्यातून तयार होणाऱ्या विविध पाककृती, त्याचे सेवन करण्याचे साधे नियम याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली. हळूहळू आहारात तृणधान्याचे प्रमाण वाढवत न्यावे, त्यातून आपण आरोग्यपथावर पुन्हा येऊ. आपल्या शरीराला उर्जा मिळाल्याने त्याचे सकारात्मक फायदे दिसू लागतील, असेही डॉ. मधुरा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने निमंत्रितांचे कवी संमेलन, ठाणे महापालिकेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, पुढील १५ दिवस आपण स्वत: तृणधान्याचा हळूहळू वापर करून आपल्याला काय फरक जाणवतो तो वहीत नोंदवून ठेवा. या धान्याबद्दल आपली खात्री झाली की मग त्याचा वेगाने प्रचार आणि प्रसार करण्याचे बळ मिळेल, असे डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले. तृणधान्यांची शास्त्रीय माहिती, त्याची वेगवेगळ्या प्रांतातील नावे, ज्वारी, बाजरी, भगर, वरी आदीचा आपण करत असलेला वापर याबद्दल डॉ. उदय यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश शर्मा यांनीही मार्गदर्शन केले. समारंभाचे अध्यक्ष महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांनी ६०च्या दशकातील अन्नटंचाई, पाठोपाठ झालेला हरितक्रांतीचा प्रयोग, देशी वाणांची झालेली पिछेहाट याविषयी माहिती दिली. या वर्षाच्या निमित्ताने ज्वारी, बाजरी सारख्या तृणधान्याला पुन्हा चांगले दिवस येतील आणि शरीराला पौष्टिक अन्न मिळेल, अशी अपेक्षा हेरवाडे यांनी व्यक्त केली.