ठाणे : ठाणे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागताच गेल्या आठवडय़ाभरात रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. खासगी कंपन्यांची कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने तसेच नागरिक कामानिमित्ताने खासगी वाहने घेऊन बाहेर पडू लागल्याने वाहन संख्येत वाढ झाल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. ठाणे जिल्ह्यात डिसेंबर मध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यामुळे जिल्ह्यातील दवाखान्यांबाहेर रांगा लागल्याचे दिसून येत होते. याच कालावधीत अनेकांना सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणेही आढळून आली होती. सर्दी, खोकला ही करोनाची लक्षणे असल्याने खासगी कंपनीच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारनेही खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर निर्बंध घातले होते.
नोकदार घरातूनच काम करत असल्याने रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत होते. परंतु गेल्या दोन आठवडय़ापासून करोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्याचे दिसून येत आहे. तसेच मुंबईत नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरणही मोठय़ाप्रमाणात झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यातील खासगी कंपन्यांची कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. या कंपन्यांमधील नोकरदार प्रामुख्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर भागातील आहेत. कंपन्या सुरू झाल्याने हे नोकदार त्यांच्या खासगी गाडय़ा किंवा कंपन्यांच्या बसमधून कार्यालये गाठू लागले आहेत. त्यामुळे आठवडय़ाभरापासून शहरातील रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. वाहनांची संख्या वाढल्याने आता कोपरी रेल्वे पुलाच्या वाहनांचा भार वाढून येथे वाहतूक कोंडीमध्ये काहीशी भर पडत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.
करोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्यानंतर रस्त्यावरील वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आमचे अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर तैनात असतात.
– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा.