डोंबिवली – पहलगाम बेसरन पठरांवरील हल्ल्याचा बदला सिंदूर या विशेष लष्करी मोहिमेतून भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करून घेतला. याबद्दल आम्हा कुटुंबीयांना खूप समाधान आणि आनंद वाटला. हा एक हल्ला झाला. दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत असे हल्ले भारताने सुरूच ठेवले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटक कुटुंंबातील हर्षद संजय लेले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांंना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले. पर्यटक कुटुंबीय दहशतवाद्यांना आम्ही काहीही केले नाही. आम्हाला सोडा, असे आर्जव करत असताना त्या मागणीचा विचार न करता दहशतवाद्यांनी अतिशय क्रूरपणे आमच्या घरातील कर्त्या पुरूषांना मारले. त्यामुळे भारताने मंगळवारी मध्यरात्री सिंदूर या विशेष नावाने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांंवर केलेली लष्करी कारवाई खूप महत्वाची आहे. मृत पर्यटकांच्या आत्म्याला या कारवाईने शांती, समाधान मिळाले असेल, असा विश्वास हर्षद संजय लेले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

पहलगाम हल्ल्यापासून आमच्यासह सर्व देशवासीय अस्वस्थ आहेतच. मंगळवारी रात्री आपण थोडा अस्वस्थ होतोच. मित्राशी संवाद साधला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागे असतानाच भारताने रात्री उशिराने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याची माहिती दूरचित्रवाहिनीतून समजली. त्यामुळे भारताची कारवाई दूरचित्रवाहिनीवरून प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली, याचेही समाधान वाटते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत अशाप्रकारचे हल्ले भारताने सुरू ठेवलेच पाहिजेत. भारत अशाप्रकारची कारवाई सुरूच ठेवील, असा विश्वास आहे, असे हर्षद संजय लेले यांनी सांगितले. भारताने केलेल्या सिंदूर मोहिमेतून दहशतवाद्यांवरील कारवाईचे कल्याण डोंबिवली शहर परिसरातून स्वागत आणि समाधान व्यक्त केले जात आहे.