केवळ पोट भरण्यासाठी अन्नग्रहण केले जात नाही. त्यासोबत जिभेचे चोचलेही पुरवले जातात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसेच चवींचेही अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे चटपटीत खाल्ल्याने केवळ पोट भरत नाही, तर तृप्तीचा ढेकरही येतो. केवळ भुकेसाठी ठाण्यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्याचबरोबर चवीचे खास शौकीन असाल तर इंदुरी स्ट्रीट हा एक उत्तम पर्याय आहे.
इंदूर शहर हे पदार्थाच्या उत्तम चवीसाठी प्रसिद्ध आहे. रतलाम तसेच इंदूरच्या पदार्थाची हुबेहूब चव ठाणेकरांनाही चाखता यावी, यासाठी या दुकानाची संकल्पना डोक्यात आल्याचे मालक विजय शर्मा यांनी सांगितले. इंदुरी पोहे हा येथील विशेष पदार्थ आहे. या पोहय़ाला महाराष्ट्रीय कांदे पोहय़ासारखीच वाफ दिली जाते. मात्र त्यात जिरा मसाला, इंदूर स्पेशल मसाला, मटार तसेच सजावटीसाठी रतलामी शेव आणि डाळिंब्याचे दाणे टाकले जातात. हा पदार्थ दिसायलाच इतका सुंदर दिसतो की, कधी एकदा ते पोहे आपण फस्त करतो, यासाठी खवय्यांची जीभ अगदी आतुर झालेली असते. कचोरीमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये जोधपुरी मुगडाळ कचोरी हा येथील सर्वात सुप्रसिद्ध पदार्थ आहे. जोधपूरला गेल्यानंतर मुगडाळ भजी हमखास खाल्ली जाते. याचाच विचार करून अशीच भजी येथे खवय्यांना खावयास मिळावी यासाठी या कचोरीचा समावेश येथील पदार्थामध्ये करण्यात आला आहे. कचोरीमध्ये डाळींच्या पिठाचा भरडा काढून त्यामध्ये जोधपुरी मसाल्यांचा वापर केला जातो. त्यानंतर त्याबरोबर पुदिना आणि गोड चटणी दिली जाते. रतलामी समोसा खाताना एक समोसा खाल्ल्यावर दुसरा समोसा खवय्यांना खाताच येत नाही इतका या समोशाचा आकार मोठा असतो. गरमागरम समोसे खाण्यासाठी खवय्ये येथे हमखास गर्दी करतात. इंदूर येथील अजून एक स्पेशल डिश म्हणजे भुट्टे का भजीया तसेच भुट्टे का कीस. भुट्टा म्हणजे मका. मक्याची कुरकुरीत भजी खाताना ‘वा काय मस्त आहे’ अशी दाद देऊन ‘अजून एक प्लेट द्या’ अशी हमखास मागणी केली जाते. थंडी तसेच पावसाळ्यात गरमागरम भजीच्या अनेक प्लेट संपतात, अशी माहिती शर्मा यांनी दिली. विशेष म्हणजे ठाणे रेल्वे स्थानकाजवळच हे दुकान असल्याने येथे खवय्यांची हमखास गर्दी असते. भुट्टे का कीस म्हणजे मक्याचा कीस काढून त्याला इंदुरी मसाल्यांची फोडणी दिली जाते. विशेष म्हणजे या सगळ्या इंदुरी आणि रतलामी पदार्थाबरोबर येथे खमण आणि फापडा हे गुजराती पदार्थही मिळतात. येथील खमणी खातानाच ती जिभेवर विरघळते इतकी लुसलुशीत आणि चविष्ट असते. दहीशेव कचोरी हा पदार्थही केल्या केल्या संपून जातो. शिवाय स्वच्छता राखण्यासाठी येथे डोक्यावर टोपी आणि हातमोज्यांचा वापर केला जातो. मात्र या ठिकाणी बसायला जागा नसल्याने खवय्यांना पदार्थाची चव उभ्यानेच घ्यावी लागते. बऱ्याच खवय्यांना तिखट खाल्ल्यानंतर काही तरी गोड लागते. त्यासाठी येथील राजवाडी लस्सी हा पदार्थ मस्तच आहे. राजवाडी लस्सी पिताना राजस्थानच्या लस्सीची आठवण होते. त्याचप्रमाणे इंदूरची प्रसिद्ध रबडीही येथे खायला मिळते. त्यातही लस्सीमध्ये या रबडीची चव मस्तच.
त्यामुळे खवय्यांना ‘दुधात साखर’ असा अनुभव मिळतो. केशरीया जिलबीमध्ये ही रबडी घातली जाते. त्यामुळे रबडी विथ जिलेबी खाण्याची मजा काही औरच आहे. तसेच या पदार्थाबरोबर दक्षिण भारतीय पदार्थही येथे मिळतात. कुरकुरीत डोसा तसेच इडली-सांबार आणि मेदुवडा आदी पदार्थानाही येथे मागणी आहे. हे सर्वच पदार्थ १० ते ७० रुपयांपर्यंत मिळतात. या स्वस्त आणि आणि चवीला मस्त अशा दुहेरी लाभामुळे खवय्यांचा येथे सतत राबता असल्याचे येथील दुकानाचे व्यवस्थापक जयेश प्रसाद यांनी सांगितले. रविवारी मात्र हे दुकान बंद असते.
कुठे- दुकान क्र. जी ५, रत्नमणी, दादा पाटील वाडी, बी केबिन, रेल्वे स्थानकाजवळ, ठाणे (प.)
वेळ- सकाळी ८ ते रात्री १०