ठाणे – आधुनिक युगात जगत असताना, त्याला शाश्वत अध्यात्माची जोड लाभावी या उद्देशाने ठाण्यात तीन दिवस ‘अध्यात्म सरितेचा’ सोहळा रंगणार आहे. ठाण्यातील इंद्रधनु या संस्थेच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आजच्या काळातील अध्यात्म, रामायण, संत जनाबाई अशा विविध विषयांवरील कीर्तन, प्रवचन आणि परिसंवादाचा आस्वाद ठाणेकरांना घेता येणार आहे. या सोहळ्याला गुरूवार, २२ मे पासून सुरूवात होणार असून शनिवार, २४ मे पर्यंत सायंकाळी ६ वाजता नौपाडा परिसरातील सहयोग मंदिर सभागृहात हा सोहळा असणार आहे.
भारतीय परंपरेनुसार पाहायला गेल्यास आयुष्याकडे अधिकाधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश अध्यात्मातून मिळत असल्याचे दिसून येते. परंपरेमध्ये विविध व्यक्तींनी, ग्रंथांनी अध्यात्माबाबतचे नानाविध विचार मांडून ठेवले आहेत. भारतीय जीवनप्रणाली आणि ज्ञानधारणेत या तत्वज्ञानाचा आणि अध्यात्माचा विचार केला जातो. संत परंपरेने अध्यात्मिक विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कीर्तन, भारूडे, प्रवचन, भजन असे मार्ग अवलंबल्याचे दिसून येते. या माध्यंमातून अध्यात्मिकरित्या मानसिक, सामाजिक जनजागृती केली जात होती.
महाराष्ट्राला लाभलेल्या संतसाहित्यातून आणि वारकरी परंपरेतून तयार झालेल्या ओव्या, कीर्तन, प्रवचने, भजन, भारूडे अशा अनेक माध्यमातून हे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवले गेले. मागील अनेक वर्षांपासून या मार्गाचा अवलंब करून मानसिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जाणीवांची, विचारांची जडणघडण झाली. याच समृद्ध परंपरेला अनुसरून एक सोहळा ठाण्यातील इंद्रधनु संस्थेच्या आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सोहळ्याच्या पहिल्या दिवशी गुरूवार, २२ मे रोजी अपरिचित रामायण या विषयावर प्रवचन केले जाणार आहे.
रामायणातील अपरिचित घटनांचा प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे हे उलगडा करणार आहेत. तर, आजच्या काळातील अध्यात्म या परिसंवादाने सोहळ्याचा दुसरा दिवस रंगणार आहे. यामध्ये अभय भंडारी, अभय टिळक आणि डॉ. धनश्री लेले यांचा सहभाग असणार असून संवादक विनायक पाचलग हे संवाद साधणार आहेत. तर या कार्यक्रमांची सांगता शनिवार, २४ मे रोजी कीर्तनाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
संत जनाबाईंचे जीवन या कीर्तनातून उलगडण्यात येणार आहे. कीर्तनकार ह.भ.प.डॉ. अवंतिका टोळे (पुणे) या संत जनाबाईंच्या जीवनातील अनुभव कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवणार आहेत. या सोहळ्याची अनुभुती घेण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इंद्रधनु संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.