डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील गणेश भक्तांना महापालिका प्रशासनाने नैसर्गिक पद्धतीने, कृत्रिम विसर्जन स्थळांची माहिती प्रभाग निहाय ऑनलाइन माध्यमातून पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
भाद्रपद महिन्यातील श्री गणेशोत्सव ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. या वर्षीच्या श्री गणेशोत्सवात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणेश भक्तांना, सार्वजनिक श्री गणेश मंडळांना आपल्या श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करणे सोयीचे व्हावे, याकरीता पालिकेच्या दहा प्रभाग निहाय नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळांची माहिती त्यांच्या गुगल मॅप सहीत https://mandap.singlewindowsystemkdmc.in/place/place या लिंकवर नागरीकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या लिंकवर क्लिक केल्यावर “प्रभाग-पत्ता-विसर्जन स्थळाचे नाव- गुगल मॅप” या स्वरुपात माहिती उपलब्ध होणार असल्याने, नागरीकांना आपले घर/ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा नजीकच्या विसर्जन स्थळी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करता येईल. त्याचप्रमाणे यामध्ये परिसरातील वाहतुकीचे चित्र देखील स्पष्ट होणार असल्यामुळे नागरिकांना विसर्जन स्थळ सुनिश्चित करणे सोयीचे होणार आहे.
तसेच या कालावधीत गणेश भक्त ज्या भागात आणि रस्ते मार्गाने गणपती विसर्जनासाठी घेऊन जाणार आहे त्या भागातील रस्ता मोकळा आहे किंवा वाहतूक कोंडीने गजबजलेला आहे याचीही माहिती गणेश भक्तांना ऑनलाइन माध्यमातून पाहता येणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील गणेश भक्तांनी अधिक अधिक पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा यासाठी पालिका प्रशासनाने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाच्या प्रमुख आणि कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. डोंबिवलीतील बंदिस्त क्रीडागृहातील कार्यशाळेत सुमारे पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी ४ हजार ६५७ गणपती मूर्ती तयार करून एक विक्रम नोंदवला आहे. बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. शाडूच्या मूर्ती बनवण्याच्या अत्रे मंदीर कडोमपा शाळा ४०० मुले, बंदिस्त क्रिडागृह कडेमपा. ४६५७, डोंबिवली गणेश मंदीर २५ मुले, गोडवली रिजन्सी इस्टेट २५, बिर्ला नाईट कॅालेज – ३५, बिर्ला डे कॅालेज -३०, शिवसेना शाखा – ४५ मुले सहभागी झाली होती.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नैसर्गिक जलस्रोत प्रदूषण मुक्त आणि स्वच्छ रहावेत यासाठी महापालिकेचे जोरदार प्रयत्न आहेत. याव्यतिरिक्त पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनीही डोंबिवलीतील गणेश मंदिरात शाडूच्या मूर्ती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या उपक्रमालाही मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


कार्यकारी अभियंता लोकरे मागील काही वर्षांपासून नागरिकांनी शाडूच्या मातीपासून तयार केलेले गणपती प्राणप्रतिष्ठेसाठी वापरावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्यशाळेत तयार झालेल्या अनेक गणपती मूर्ती नागरिकांनी आपल्या घरी प्राणप्रतिष्ठीसाठी नेल्या आहेत.