ठाणे : ठाणे शहरात यापुर्वी झालेल्या अनेक विकासकामांच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या आयआयटी पथकाने शहरातील रस्ते कामांची पाहाणी सुरु केली आहे. राज्य सरकारने दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून ठाणे शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे दर्जात्मक व्हावी यासाठी आग्रही असलेले आयुक्त बांगर यांनी गेल्या काही महिन्यांपासून कडक भुमिका घेतली असून त्यांनी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई महिनाभरापुर्वी केली आहे. त्यामुळे आयआयटीच्या पथकाने सुरु झालेली रस्ते कामांची पाहाणी, ही महत्वाची मानली जात आहे.
करोना काळापासून जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पालिकेच्या विविध विभागांकडून अपेक्षित कर वसुली होत असली तरी ही रक्कम करोना काळात पालिकेवर झालेले दायित्व कमी करण्यावर खर्च होत आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने रस्ते नुतनीकरणाची योजना आखली होती. परंतु त्यासाठी पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध नव्हता. यामुुळेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या माध्यमातून पालिकेला ६०५ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. ठाणेकरांचा प्रवास खड्डेमुक्त व्हावा या उद्देशातून त्यांनी हा निधी देऊ केला आहे. परंतु ठाणे शहरात यापुर्वी झालेल्या अनेक विकासकामांच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा >>> ठाणे: रेल्वे पुलाखालील वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना
शहरातील उड्डाणपुले, उद्याने, महत्वाचे रस्ते, चौक यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही दर्जाहीन कामांमुळे ठाणेकरांच्या पदरी निराशाच पडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शहरातील विकास प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेस देत असल्याने हाती घेतलेल्या कामांचा दर्जा कोणत्याही परिस्थितीत खालावू दिला जाणार नाही, अशी भुमिका आयुक्त बांगर यांनी घेतली असून ही सर्व कामे दर्जेदार व्हावीत यासाठी आयआयटीतील ज्येष्ठ तज्ञांची कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी जाहिर केले होते. त्यांच्या आदेशानंतर आयआयटीचे के.व्ही.कृष्णराव यांच्या नेतृत्वाखाली रस्ते कामांचे लेखापरिक्षण करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले असून या पथकाने रस्ते कामांची पाहाणी सुरु केली आहे.
ठाणे महापालिका अभियंत्यासोबत आयआयटीचे पथक रस्ते कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी करीत असून त्याचबरोबर रस्ते कामांसाठी वापरलेल्या साहित्यांची माहिती घेत आहेत. रस्ते कामांसाठी वापरलेले साहित्या योग्य प्रमाणात आहे की नाही, याची माहिती घेत आहेत. डांबरी रस्त्यांसाठी ज्याठिकाणी डांबर तयार केले जात आहे, त्या युनीटला पथक भेट देऊन त्याची गुणवत्ता तपासत आहे. तयार झालेल्या रस्ता वेगवेगळ्या प्रकारे तपासणी केली जात आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.