प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थ्यांनी भविष्यात एक जबाबदार नागरिक म्हणून वावरावे यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाने चाकोरीबद्ध शिक्षणाची चौकट मोडून नावीन्यपूर्ण उपक्रमांची वाट चोखाळली आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून महाविद्यालयालगतच्या दोन उद्यानांच्या देखभालीची जबाबदारी ज्ञानसाधनाने स्वीकारली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने महाविद्यालयाबाहेर चौकी उभारली आहे. आता लवकरच महाविद्यालयातच गरजू विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ उपक्रमातून स्वावलंबनाचे धडे दिले जाणार आहेत. या आणि इतर उपक्रमांविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांच्याशी साधलेला संवाद..

’विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या आहेत?

मुलं लहान असताना आई-वडील त्यांच्यावर संस्कार करतात. शाळेमध्ये त्यांच्यावर शिक्षणाचे प्राथमिक संस्कार होतात. पुढे महाविद्यालयाच्या पायरीवर मात्र ते स्वत: विचार करू शकतात. एकटय़ाने निर्णय घेऊन ते अमलात आणायला याच वयात शिकतात. त्यामुळे याच काळात त्यांना बऱ्या-वाईटाची कल्पना देणे ही महाविद्यालयांची जबाबदारी असते. सुदृढ समाजासाठी सुजाण नागरिक घडवणे हे महाविद्यालयांचे कर्तव्य असते. त्यामुळे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकीची जाणीव व्हावी यासाठी आम्ही विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण, वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येतात. या वर्षी मानवी हक्क या विषयाचेही मार्गदर्शन दिले जाणार आहे. उन्हाळी सुट्टीमध्ये योग वर्ग, टेबलटेनिस, बुद्धिबळ, कॅरम यांसारखे खेळ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.

’ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत?

ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना १९८०मध्ये झाली. सुरुवातीला फक्त अकरावी-बारावीचे वर्ग होते. सध्या येथे अकरावी ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर एम.एस्सी., एम.कॉम.(व्यवस्थापन) हे पदव्युत्तर अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, कलामंडळ, वार्षिक महोत्सव यांसारखे उपक्रम राबविले जातात. वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन कोर्स या विषयाला पर्याय म्हणून शारीरिक शिक्षण या विषयासाठी विद्यापीठाकडे विनंती करण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या विषयासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.  वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून संशोधन आणि प्रकल्पांवर अभ्यास सुरू असतो. तसेच विद्यार्थ्यांसाठी जिमखाना, ग्रंथालय, कॉन्फरन्स रूम आदी सुविधा उपलब्ध आहेत.

’ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये कोणकोणते सामाजिक उपक्रम राबविले जातात?

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकी निर्माण व्हावी यासाठी रक्तदान शिबिरे, उत्सवांच्या काळात नागरिकांसाठी मदतकार्य, स्वच्छता अभियान यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. हल्ली विद्यार्थ्यांमध्ये वेगाने गाडी चालविणे, सिगारेट ओढणे, वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी जाणे असे प्रकार बळावताना दिसून येत आहेत. यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालय आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या बाहेर पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. महाविद्यालयाने पोलिसांसाठी सर्व सोयी असेलेले एक पोर्ट केबिन उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनवणे. विद्यार्थ्यांकडून वापरात नसलेले मोबाइल, संगणकाचे भाग, इअरफोन आदी ई-वेस्ट(इलेक्ट्रॉनिक कचरा) गोळा करून त्याचा पुनर्वापर करणे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध भागांतील आवाजाची पातळी मोजली जाणार आहे.

’पोलीस चौकी प्रकल्पाला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद कसा ?

महाविद्यालयाच्या बाहेर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी व्यवस्थापनाने ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला. त्यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्वरित या प्रकल्पाला मान्यता दिली. शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीलाच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयाच्या बाहेरील वातावरणात लक्षणीय बदल दिसून आला. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्तीचे वातावरण निर्माण झाले. या पोलीस चौकीमुळे मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून त्यामुळे पालकांनाही एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

ठाणे महानगरपालिकेने सुपूर्द केलेल्या उद्यानाची देखभाल कशा प्रकारे करणार?

ठाणे महानगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर महाविद्यालयाच्या आवारातील दोन बागा संगोपन आणि संवर्धनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाला दिल्या आहेत. येथे सध्या महाविद्यालयाच्या वनस्पती विभागतील तज्ज्ञ संशोधन करत असून भविष्यात येथे जैविक कचरा, महाविद्यालयाच्या स्वयंपाकघरातील कचरा तसेच विद्यार्थ्यांच्या डब्यातील उरलेले अन्न आदीं गोष्टींपासून खतनिर्मिती करणे, तसेच वनस्पती संशोधन आणि फुलपाखरूमळा असे विविध उपक्रम राबविण्याचा विचार आहे. हे उद्यान सदाहरित ठेवण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत.

ज्ञानसाधना महाविद्यालयाकडून सध्या कोणकोणते उल्लेखनीय प्रकल्प राबविले जात आहेत?

ज्ञानसाधना महाविद्यालयामधील काही विद्यार्थी हे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने सध्या ‘कमवा आणि शिका’ अशी एक मोहीम सुरू केली आहे. महाविद्यालयीन वेळेनंतर काही तास तेथील जिमखान्यात मदत करणे, ग्रंथालयाची देखभाल करणे, डेटा इन्ट्री (संगणकीय नोंद) करणे अशा प्रकारची काही कामे प्रतिनिधी म्हणून त्यांना देण्यात येणार आहेत. या कामाचा त्यांना मोबदला दिला जाईल. त्यामुळे शिकत असतानाच स्वावलंबनाची संधी त्यांना महाविद्यालयातच मिळू शकेल. या प्रयोगाला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या काळातही विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राइमविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पोलीस निरीक्षक जे. के. सावंत (सायबर क्राइम) यांचा मार्गदर्शनपर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

कलागुणांना वाव देण्यासाठी कोणते उपक्रम राबविता?

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी जास्तीत जास्त तरुणांच्या कलेने उपक्रमांची आखणी करण्याचा प्रयत्न असतो. भारतीय संशोधकांनी यशस्वीरीत्या मंगळ मोहीम पार पाडल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी मंगळाची प्रतिकृती तयार करून त्यावर आपली मते मांडली. विद्यार्थ्यांसाठी नृत्य कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. यंदा खास विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट तयार करून सेल्फी स्पर्धा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात फणसे कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आणि स. वि. कुलकर्णी व्याख्यानमाला हे दोन उत्कृष्ट उपक्रम राबविले. यंदा स. वि. कुलकर्णी व्याख्यानमालेमध्ये वैज्ञानिक आणि सामाजिक कार्यकर्ता अशा दोन वक्त्यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न आहे. यंदा आम्ही खास प्राध्यापक-शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध गुणदर्शनाची संधी देणारी संमेलने आयोजित करणार आहोत.
-शलाका सरफरे

 

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview with chandra shekhar marathe
First published on: 06-10-2015 at 01:45 IST