ठाण्यातील खासगी शाळांचा मनमानी कारभार आता शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरू लागला आहे. शहरातील अनेक खासगी शाळा त्यांच्या बसगाड्यांना शाळेच्या आवारात प्रवेश बंदी करत असतात. त्यामुळे या बसगाड्या भर रस्त्यात उभ्या केल्या जात असून त्याचा शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागला आहे. रस्ते अडवून या बसगाड्या उभ्या राहत असल्याने वाहन चालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच शाळेबाहेर होणाऱ्या वाहतूक कोंडीविषयी तोडगा काढण्याचे आश्वासन सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिले होते. परंतु ठोस अशी उपाययोजना प्रशासनाकडून झालेली नाही.

ठाणे शहरातील बहुतांश खासगी शाळा त्यांच्या आवारात शाळेच्या बसगाड्यांना प्रवेश नाकारत असतात. तर काही नामांकित शाळांना मोकळे मैदान किंवा वाहने उभी करण्यास पुरेशी जागाही शिल्लक नाही. त्यामुळे या शाळांसमोर मोठ्याप्रमाणात खासगी शाळांच्या बसगाड्यांच्या लांबलचक रांगा लागलेल्या असतात. तर काही पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी कार, दुचाकी घेऊन येत असतात. या गाड्याही रस्ते अडवून उभ्या केल्या जातात. त्यामुळे शाळेच्या बाहेरील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. त्याचा नाहक त्रास कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात नागरिकांकडून पोलिसांना तक्रारी प्राप्त होऊनही शाळांविरोधात कारवाई करणे पोलिसांना जड जात आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी एका बैठकीत हा महत्त्वाचा मुद्दा समोर आल्यानंतर ठाणे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी काही खासगी शाळांच्या वर्ग सुटण्याच्या वेळांमध्ये बदल करता येतो का तसेच इतर काही पर्याय निर्माण करता येतात का, याबद्दल माहिती घेण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या. परंतु त्यानंतरही शहरातील शाळाबाहेरील बसगाड्यांविरोधात कोणतीही ठोस भूमिका वाहतूक विभागाकडून घेण्यात आली नाही.

नेमके काय होत आहे
ठाण्यातील वर्तकनगर, कापूरबावडी, वसंत विहार, घोडबंदर परिसरात अनेक मोठ्या खासगी शाळा आहेत. या शाळांसमोरील रस्ते मोठे असूनही कार, दुचाकी घेऊन येणारे पालक आणि शाळेच्या बसगाड्या एकाचवेळी उभे राहतात. अनेकजण त्यांच्या वाहने अर्धा रस्ता अडवून उभी करतात. तर, बसगाड्यांच्याही दोन रांगा लागल्या जातात. विद्यार्थी शाळेबाहेर पडल्यास मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक करण्यासाठी चालकांना पुरेशी जागा शिल्लक नसते. या बसगाड्या आणि वाहनांमुळे नागरिकांनाही खोळंबून राहावे लागत आहे.

या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डी. बी. कांबळे यांना संपर्क साधला असता, त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागासोबत लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगी शाळांबाहेर बेकायदा वाहने उभी करण्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.. वर्तकनगर येथील पोखरण रोड हा ९० फुट रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु शाळा सुटण्याच्या वेळेत या रुंद रस्त्यावरही वाहतूक कोंडी होत असते. तसेच शहरात अनेक खासगी शाळा आहेत. जिथे मोकळी जागा असूनही या बसगाड्या आत उभ्या केल्या जात नाही. आम्ही वाहतूक पोलिसांना त्यांसदर्भात वारंवार पत्रव्यवहार करतो. परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. – प्रसाद भांदीगरे, सांस्कृतिक विभाग, ठाणे विधानसभाध्यक्ष, मनसे.