येत्या २६ मार्चपासून सुरु होणाऱ्या ‘इंडियन प्रमियर लीग’ च्या (आयपीएल) पार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (आरसीबी) संघाने ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सराव सुरु केला आहे. त्यामध्ये दिनेश कार्तिक, फिन ॲलन, रूदरफोर्ड, डेव्हीड विली यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना मुंबईतील निवासस्थानापासून ते दादोजी कोंडदेव स्टेडियमपर्यंत वाहतूक करताना कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. तसेच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतर खेळाडू देखील सोमवारपासून सरावासाठी ठाण्यात दाखल होणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये बीसीसीआयच्या नियमावलीनुसार नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली पालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे. यामुळे याठिकाणी तब्बल २५ वर्षांनंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने काही महिन्यांपूर्वी खेळविणे शक्य झाले. त्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आता सरावासाठी या मैदानाची निवड करू लागले आहेत.

एकनाथ शिंदेंनी केली मैदानाची पाहाणी

आयपीएलच्या नव्या हंगामाला येत्या २६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू’ या संघाने सरावासाठी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सरावासाठी मैदान सज्ज ठेवण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु केले होते. या तयारीचा आढावा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेऊन काही सूचनाही केल्या होत्या.

‘रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू’ हा संघ ठाण्यात सराव करणार असला तरीही बीसीसीआयच्या नियमावलीनुसार खेळाडू बायो-बबलमध्ये असणार आहेत. तसेच त्यांच्या वाहतुकीदरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आनंदनगर, कॅडबरी जंक्शन, खोपट, डॉ. आंबेडकर मार्ग, पोस्ट कार्यालय, जेल तलाव, क्रीकनाका आणि स्टेडियम या मार्गावर ग्रीन कॅरीडोर करण्यात आला होता. त्यासाठी सुमारे ५० वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या खेळाडूंच्या स्वागतासाठी स्टेडियमबाहेरील भिंत सुशोभित करण्यात आलेली असून त्याचबरोबर शहरात जागोजागी फलकही लावण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आयपीएल पूर्व तयारीचे सरावसत्र ३१ मार्च पर्यंत चालणार आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे सरावसत्र सुरु असणार आहे. त्यानंतर येथे एप्रिल महिन्यात पाच दिवस तर मे महिन्यात दोन दिवस सराव होणार आहे.