कल्याण : कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्तीमध्ये राहत असलेल्या एका इराणी महिलेला मेफोड्रेन या अंमली पदार्थांची तस्करी करताना खडकपाडा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी शिताफीने पकडले आहे. या महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख १६ हजार रूपयांची एम. डी. पावडर (एम. डी.) जप्त केली आहे. फिजा मनोज इराणी (२९, रा. पाटीलनगर, इराणी वस्ती, आंबिवली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तस्करी, सरकारी कामात अडथळा आणि अनेक गुन्हेप्रकरणी या महिलेवर कोळसेवाडी, खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
खडकपाडा पोलीस ठाण्याचे अंमली पदार्थ विरोध पथक बुधवारी दुपारी आंबिवली इराणी वस्ती परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना अटाळी आंबिवली रस्त्यावरील ९० फुटी रस्त्याच्या कडेला एक दुचाकी वाहन उभे असल्याचे दिसले. त्या स्कुटीजवळ एक महिला उभी होती. पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्या महिलेकडे चौकशी केली आणि तिच्या ताब्यातील स्कुटीची तपासणी केली. स्कुटीच्या आसनाखालील वस्तू ठेवण्याच्या जागेत बंदिस्त केलेली मेफेड्रोनची पावडर आढळून आली. पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी सुरू केल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. ही मेफोड्रेन पावडर तिने कोठुन आणली होती. ती पावडर ती कोणाला विकणार होती, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. गेल्याच आठवड्यात पोलिसांनी आंबिवली पाटीलनगर भागातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या इसमाला अटक केली होती. इराणी वस्तीमधील काही गुन्हेगारांकडून शहर परिसरात अधिक प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या वस्ती परिसरात पोलिसांची सतत गस्त असते.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सबाजी नाईक, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार सदाशिव देवरे, अमित शिंदे, राहुल शिंदे, सुनिता होडगर, भावना भट यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली.