ठाणे : शहापूर तालुक्यातील मौजे बाबरे गावाजवळ राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत एका नाल्यावर बांधण्यात आलेला तब्बल २६ लाख रुपयांचा सिमेंट काँक्रीट बंधारा तोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून किन्हवली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहापूर तालुक्यात जलसिंचनाच्या कामांतर्गत विविध ठिकाणी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. याच दरम्यान तालुक्यातील साकडबाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बाबरे परिसरातील नाल्यावर २०१७-१८ या आर्थिक वर्षात शासनाच्या निधीतून सिमेंट काँक्रीटचा बंधारा उभारण्यात आला होता. या कामासाठी शासनाकडून तब्बल २६ लाख १६ हजार रुपये खर्च करण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी संबंधित बंधारा तोडल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून विभागाकडे करण्यात आली. याबाबतची तक्रार मिळताच जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, सदर बंधारा पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले.

शहापूर तालुक्यात जलसिंचनाच्या कामांतर्गत विविध ठिकाणी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. याच दरम्यान तालुक्यातील साकडबाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बाबरे परिसरातील नाल्यावर २०१७-१८ या आर्थिक वर्षात शासनाच्या निधीतून सिमेंट काँक्रीटचा बंधारा उभारण्यात आला होता. या कामासाठी शासनाकडून तब्बल २६ लाख १६ हजार रुपये खर्च करण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी संबंधित बंधारा तोडल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून विभागाकडे करण्यात आली. याबाबतची तक्रार मिळताच जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, सदर बंधारा पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले. बंधाऱ्याचा केवळ काही अवशेष शिल्लक असल्याचे दिसून आले.

शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्याचे झालेले नुकसान हे थेट सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान असल्याने या प्रकाराबाबत गंभीरता दाखवत उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती जलसंधारण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी किन्हवली पोलिस ठाण्यात तक्रार देत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. सार्वजनिक संपत्तीचे जाणीवपूर्वक नुकसान केल्याच्या आरोपाखाली संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, या घटनेमुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीवर पाणी फिरले असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेले असे प्रकल्प जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

के.टी. बंधारा म्हणजे पावसाळ्यात नदी-नाल्याचे पाणी थांबवून जमिनीत पाणी मुरावे, भूजलपातळी वाढावी व शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या काळात फायदा व्हावा, यासाठी बांधण्यात येणारी महत्वाची जलसंधारण संरचना. अशा रचनांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते.