श्रावण महिन्यात घरोघरी पारंपरिक पदार्थाचा महोत्सवच भरलेला असतो. श्रावण संपला तरी अनेकजण गणेशोत्सवापर्यंत तर काहीजण थेट दसऱ्यापर्यंत सामिष आहार घेत नाहीत. त्यामुळे भाद्रपदामध्येही मांसाहार तसा व्यज्र्यच असतो. अशा वेळी दुसरे काहीतरी शाकाहारी पण चमचमीत खावेसे वाटते. अशा काही हटके पदार्थाच्या शोधात असाल तर डोंबिवलीतील ‘डेलिझिओस’ या इटालियन मॅक्सिको पदार्थाच्या कॉर्नरला भेट द्यायला हरकत नाही. या दुकानातील पदार्थाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे तयार करण्यात येणारा पिझ्झाचा पावही येथेच तयार केला जातो. ताजा, गरमागरम आणि मऊ पावासाठी येथे तरुण पिढीच काय पण वयोवृद्धही गर्दी करतात. कारण पाव चावताना किंवा तोडताना कष्ट पडत नाहीत. इथला मऊ-लुसलुशीत पाव तयार करण्यासाठी दररोज १०० किलो मैदा लागत असल्याचे या कॉर्नरचे मालक केदार वैद्य यांनी सांगितले. स्वत: एमबीए असलेल्या केदार वैद्य २०१२ पासून खाद्यपदार्थाचा व्यवसाय करीत आहेत. विविध नवनवीन पदार्थ शिकून ते इतरांना खिलवावे यासाठी ते तत्पर असतात. या दुकानात इटालियन पदार्थाची चव चाखताना जवळपास नव्वद टक्के इटलीच्या पदार्थाची चव आपणास चाखावयास मिळते. उर्वरित दहा टक्के भारतीय चवीचा स्वाद या पदार्थामध्ये असतो. मसाले, सिमला मिरची, फरसबी, कांदा, टोमॅटो आदी भाज्या हे पदार्थ करताना वापरण्यात येतात. येथे मिळणारा कीड्स पिझ्झा हा पदार्थ लहान मुलांना विशेष आवडतो. याचा आकार अगदी लहान असतो. त्यामुळे तो खाताना लहान मुलांना त्रास होत नाही. तसेच पाव मऊ आणि पातळ असतो. येथे मिळणारी चीज अॅलापेनोस मॅक्सीकम चिली हा पदार्थ खवय्ये अधिक पसंत करतात. यामध्ये इटालीयन मिरची आणि त्यावर चीज, सॉस टाकून दिली जाते.येथे इटालीयन सॅन्डविचचे विविध प्रकार मिळतात. एक सॅन्डवीच बनवायला १५ ते २० मिनिटे लागतात. सॅन्डविच तयार करताना आधी हे सॅन्डविच खरपूस पण हलकेसे ग्रील केले जाते. त्यानंतर त्याला चटणी लावून पुन्हा गरम केले जाते. त्यानंतर विविध प्रकारच्या भाज्या त्यात घातल्या जातात. इटालीयन राईसही येथे बनवला जातो. यामध्ये आरबिटा रीसाटो नावाचा एक पदार्थ आहे. या पदार्थामध्ये आरबिटा नावाचा इटालीयन तांदूळ वापरतात. दर महिन्याला २०-२५ किलो तांदूळ लागत असल्याचे केदार यांनी सांगितले. एक किलो तांदळाला खूप जास्त पाणी लागते आणि तो शिजायालाही खूप वेळ लागतो, अशी माहिती त्यांनी दिली. येथे मिळणाऱ्या फ्रुट पंच ज्युसमध्ये संत्र, अननस, स्ट्रॉबेरी, कीवी, पीच आदी फळांचा वापर केला जातो. उन्हाळ्यामध्ये या मॉकटेल्सना अधिक मागणी असते. मात्र इतर दिवशीही फारशी भूक नसल्यास अनेकजण हे ज्युस घेतात. त्यामुळे तरतरी येते. शरीरात अधिक ऊर्जा निर्माण होते. यामध्ये स्ट्रॉबेरी, अननस, किवी असे वेगवेगळे ज्युसही आहेत. विविध इटालीयन पास्ताही येथे उपलब्ध आहेत. येथे किवी आईस टी, लेमन आइस टी या पदार्थानाही अधिक प्रमाणात मागणी आहे. स्ट्रॉबेरी पन्ना कोट्टा, चॉकलेट पन्ना कोट्टा, सिझलींग हॉट ब्राऊनी, हॉट ब्राऊनी या गोड आणि गरमागरम पदार्थानाही येथे मागणी आहे.
कुठे – शॉप नं-४ ए, चंद्रमा सीएचएस, डॉ. आर. पी. रोड, रघुवीर नगर, चार रस्त्याजवळ, डोंबिवली (पूर्व)
कधी – दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत.