ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक २०२५ ची प्रभाग रचना करावयाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्याय निवाड्यांमध्ये निकडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक ( Free, Fair and Transperent) असणे आवश्यक आहे. मात्र, ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक हि तत्त्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रभाग रचना सुनावणीदरम्यान केला.

ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या २७० तक्रारींवर आज, बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला उपस्थितीत राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले. प्रभाग रचना २०११ सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात आहे असे जाहीर करण्यात आले आहे.

प्रभाग रचनेचा जो मसुदा (Draft) प्रसिध्द करण्यात आला त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शविण्यात आली. मात्र, मसुद्या मध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रती प्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसुचित जाती व जमातींची लोकसंख्या ही मुलभूत माहिती प्रसिध्द करण्यात आली नाही. यामुळे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या मसुद्यांमधील (Draft ward Formation) लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचाराणा करुनही सदर माहिती प्राप्त झाली नाही, असा आक्षेप आव्हाड यांनी नोंदवला.

कळवा मुंब्रा क्षेत्रात जास्त लोकसंख्येचे प्रभाग बनविला

नागरिकांना योग्य व पुरेसे प्रतिनिधीत्व मिळावे याकरिता निवडणूका घेतल्या जातात, त्यासाठी पूर्ण शहरातील लोकसंख्या लक्षात घेऊन एकूण नगरसेवक पद संख्या निर्धारीत केली जाते. एकूण नगरसेवक पद संख्येनुसार प्रती नगरसेवक लोकसंख्या ठरविली जाते. सामान्यतः चार नगरसेवकांचा एक प्रभाग व आवश्यकता भासल्यास तीन किंवा पाच नगरसेवकांचा एक प्रभाग अशी प्रभाग रचना करणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ठरविताना सरासरी लोकसंख्यच्या १०% जास्त पर्यंत किंवा १०% कमी पर्यंत इतकी लोकसंख्या कमी जास्त करता येते.

ठाणे महानगरपालिकेची प्रती ४ सदस्य प्रभाग सरासरी लोकसंख्या ५६,२२८ आणि प्रती तीन सदस्य सरासरी लोकसंख्या ४२.१७१ इतकी आहे. १०% जास्त व १०% कमी असा एकूण २०% लोकसंख्या फरकाचा गैर फायदा घेऊन ठाणे शहर क्षेत्र व दिवा क्षेत्र येथे कमी लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यांत आले आणि कळवा मुंब्रा क्षेत्रात जास्त लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यांत आले आहे. या प्रकारे कळवा, मुंब्रा क्षेत्रात ४ सदस्यांचा पूर्ण एक प्रभाग चोरण्यात आला आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.

सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मत म्हणून…

सामान्यताः ठाणे महानगरपालिकेचे ठाणे शहर, कळवा, मुंब्रा आणि दिवा असे तीन भौगोलिक व राजकीय भाग आहेत. महापालिकेने प्रसिध्द केलेल्या मसुद्या नुसार ठाणे शहर क्षेत्राची लोकसंख्या ११,६०,४१९, कळवा व मुंब्रा क्षेत्राची लोकसंख्या ४,७५,५२२ आणि दिवा क्षेत्राची लोकसंख्या २,०५,५४७ अशी आहे. ठाणे शहर क्षेत्रामध्ये एकूण २१ प्रभाग प्रस्तावित केले आहेत आणि एकूण नगरसेवक संख्या ८४ इतकी आहे. कळवा, मुंब्रा क्षेत्रामध्ये एकूण ८ प्रभाग प्रस्तावित आहेत आणि एकूण नगरसेवक संख्या ३२ इतकी आहे. दिवा क्षेत्रामध्ये एकूण ४ प्रभाग प्रस्तावित आहेत आणि एकूण नगरसेवक संख्या १५ इतकी आहे. याचा अर्थ की, कळवा, मुंब्रा क्षेत्रामध्ये एकूण ४,७५,५२२ / १४०५७ = ३४ इतकी नगरसेवक संख्या असणे अपेक्षित आहे, मात्र ३२ नगरसेवक प्रस्तावित केले आहे.

ठाणे शहर क्षेत्रामध्ये एकूण ११,६०,४१९ / १४०५७ = ८२ इतकी नगरसेवक संख्या अपेक्षित आहे. मात्र ८४ नगरसेवक प्रस्तावित केले आहे. दिवा क्षेत्रामध्ये २,०५,५४७ /१४०५७ = १३ इतकी नगरसेवक संख्या अपेक्षित आहे, मात्र एकूण नगरसेवक संख्या १५ इतकी प्रस्तावित आहे. कळवा, मुंब्रा क्षेत्रामध्ये आता पर्यंत झालेल्या निवडणूकामधून या भागातून नेहमी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मत झालेले आहे. त्यामुळे येथील नगरसेवक संख्या कमी करण्यात आली आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.

तेव्हाच चर्चेस सहभागी होऊ

ठाणे महानगरपालिकेचे प्रस्तावित प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक या तत्वाचा पूर्ण भंग केलेला आहे. ज्या आधारावर वॉर्ड रचना झाली, तेच जनतेपासून लपवून ठेवायचे असेल तर मग हरकती- सूचना आणि प्रभाग रचनेची निवडणूक आयोगामार्फतची चर्चा हा सर्व फार्स कशासाठी? किंबहुना, ठाणे शहरातील प्रभाग रचना हा फार्स आहे, हे चार महिन्यांपूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला कळवून यामध्ये लक्ष घालण्यास सुचविले होते. पण. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले असल्याने निवडणूक आयोगाकडून काही फार अपेक्षा नव्हत्या.

आता मात्र वोट चोरी प्रमाणेच, सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झालेले चित्रीकरण लपवून ठेवायचे अन् मतदान वाढले असे सांगायचे, पुरावे मात्र शून्य! तसेच, वॉर्ड रचना आम्ही कायदेशीररीत्या केलेय, असे सांगायचे आणि प्रगणक गटच द्यायचा नाही. यालाच तर आम्ही वोट चोरी म्हणतो. प्रभाग रचनेत नगरसेवक संख्या चोरी करण्यात आली आहे. स्वायत्त निवडणूक यंत्रणा आणि स्वायत्त निवडणूक आयोग हे आता इतिहासजमा झाले आहे आणि ठाण्यातील सर्व प्रभाग रचनेवर आमची हरकत आहे म्हणूनच ठाणे शहत्ची प्रगणक गट (EB) ची पूर्ण माहिती मिळाल्यावर आम्ही चर्चेस सहभागी होऊ, असे आव्हाड म्हणाले.