ठाणे : येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाण्याला हे वरदान आहे. ते सांभळणे आवश्यक आहे. परंतु येऊरमधील ७५ एकर जमीनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. येऊरमध्ये आदिवासांचा हक्क आहे. परंतु त्यांना मारून त्यांच्या जमीनी कब्जात घेतल्या जात आहे. येथे आता राज महल उभे राहत आहेत, वन विभाग, महापालिका काय करत आहे असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. आव्हाड यांनी येऊरमध्ये जाऊन एका मोठ्या बांधकामाची देखील पाहणी केली. ठाण्यातील एक बांधकाम व्यवसायिक येथे बंगला बांधत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येऊर वन परिक्षेत्र आहे. या भागात जैवविविधता आहे. परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये या भागात मोठ्याप्रमाणात बेकायदेशिररित्या ढाबे, हाॅटेल उभे राहिले. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथे बंगले देखील उभे केले आहेत. येऊरच्या जंगलात मध्य रात्री होणाऱ्या पार्ट्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येथे मद्याच्या पार्ट्या देखील केल्या जातात. परंतु प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अनेकदा आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलने देखील केली. त्यामुळे येऊरच्या जंगलातील राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सोमवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टिका केली.

येऊरचे निसर्ग सौंदर्य नष्ट होत आहे. सुमारे ७५ एकर वन जमीन खासगी लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमीनींचा ताबा घेण्यात आला. वन जमीनीवर आता राज महल उभे राहायला लागले आहेत. कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे. ठाणे महापालिका गरीबांची बांधकामे तोडत आहे. पण मग हे यांना दिसत नाही का? असा सवाल आव्हाड यांनी महापालिकेवर उपस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येऊरमध्ये निर्मल सोळंकी नावाचा व्यक्ती गुंड घेऊन येतो आणि आदिवासींना बाहेर काढून जमीनीचा कब्जा घेतो असा आरोपही त्यांनी केला. पूर्वी येऊरच्या रस्त्यावर बिबटे फिरायचे. आता बिबटे दिसत नाही. येथे लाॅन्स उभारण्यात आले आहेत. तेथे विवाहासाठी परवानगी कशी दिली जाते, असेही आव्हाड म्हणाले. जमीनीसंदर्भाच्या तक्रारी पोलिसांकडे जातात. पण तक्रारी घेतल्या जात नाहीत. ठाण्यातील एक मोठा विकासक बंगला बांधत आहे असा आरोपही त्यांनी केला.