Jitendra Awhad on 10 Hours Work : सर्वसामान्य खासगी क्षेत्रातील नोकरदार योग्य प्रकारे न झालेली वेतन वाढ आणि कामाच्या तासांमुळे नोकरदार त्रस्त असतानाच, राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र सरकारने खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी दररोज कामाचे तास १० करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे असा दावा आव्हाडांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट्स एक्ट, २०१७ मध्ये हे बदल केले जातील असेही ते म्हणाले आहेत. नेमके आव्हाड काय म्हणाले पाहूया.

खासगी क्षेत्रात नोकरदारांची त्यांच्या कामाच्या ठिकाणी होणारी पिळवणूक, कामाचा अतिरिक्त ताण, नोकरी बाबत असुरक्षित वातावरण अशा विविध कारणांमुळे खासगी क्षेत्रातील नोकरदार हैराण झाले आहे. असे असतानाच आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक दावा केला आहे. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारने खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी दररोज कामाचे तास ९ ते १० करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट्स एक्ट, २०१७ मध्ये हे बदल केले जातील असे म्हटले आहे. आव्हाड यांनी त्यासंदर्भाचे एक्स या समाजमाध्यमावर ट्विट प्रसारित केले आहे.

(Jitendra Awhad) आव्हाड यांचा दावा काय?

आव्हाड यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘महायुती सरकारचा सर्वसामान्यांना धोका! महाराष्ट्र सरकारने खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठी दररोज कामाचे तास ९ → १० करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे! “महाराष्ट्र शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट्स एक्ट, २०१७” मध्ये हे बदल केले जातील:

दररोज १० तास काम (आधी ९), अर्धा तास ब्रेक दिला तरी सलग ६ तास काम करवता येईल, ओव्हरटाईम तीन महिन्यात १२५ → १४४ तास, ओव्हरटाईम मर्यादा १०.५ → १२ तास, तातडीच्या कामासाठी (urgent work) कोणतीही मर्यादा नाही – २४ तासही पिळवणूक शक्य!

पुढे ते लिहीतात, आधीच महागाई, स्थिर पगार, बेरोजगारी आणि नोकरीची असुरक्षितता यामुळे कामगार दबावाखाली आहेत. आता अजून तासभर कामावर दबाव वाढवला जाणार आहे! लोकांना मतदानाच्या वेळी “कामगार हिताचे” आश्वासन दिले जाते, पण प्रत्यक्षात निर्णय कारखानदार व भांडवलदारांसाठी घेतले जातात. लक्षात ठेवा: जे सरकार मतदारांच्या जीवनाची किंमत भांडवलदारांच्या नफ्यापेक्षा कमी मानते, ते सरकार लोकांचे नसून भांडवलदारांचे असते! आज हा प्रस्ताव, उद्या कायद्याचा भाग झाला तर कामगार गुलामगिरीच्या युगात ढकलले जातील. जागे व्हा! कामगारांचा अधिकार वाचवा! असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.