कल्याण – सर्व प्रकारचे वाद पेटवून झाले. आता राहिला होता तेवढा शाकाहरी आणि मांसाहरी वाद. तोच पेटविण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शासन आदेशावरून १५ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेऊन मटण मांस विक्रीवर बंदी घातली आहे का? स्वातंत्र्य दिनी कल्याण डोंबिवलीतील रहिवाशांनी फक्त श्रीखंड, पुरी, अळुचे फतफते, बटाट्याची भाजी खावी, असे काही आदेश आहेत का? पालिका आयुक्तांनी याचे जाहीरपणे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे डाॅ. आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना कल्याण डोंबिवलीतील स्वातंत्रदिनाच्या दिवशीच्या मटण मांस विक्रीच्या पालिकच्या निर्णयावर टीका केली.

१५ ऑगस्ट आहे म्हणून कोणी काय खावे, असा काही नवीन आदेश शासनाने काढला आहे का? असे आदेश काढणाऱ्या कडोंमपातील गायकवाड या महिला अधिकारी कोण? कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पालिकेचा असा निर्णय असेल तर आपण कल्याण डोंबिवलीत जाऊन स्वातंत्र्यदिनी हमखान मटण मांसाचे भोजन आपण करणार आहोत. मग त्यासाठी कोण काय कारवाई करायला येते ते मी बघतो, असा थेट इशारा डाॅ. आव्हाड यांनी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिला.

१५ ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व प्रकारचे कत्तलखाने आणि मटण मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश बाजार परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी यापूर्वीच्या प्रशासनाच्या ठरावाप्रमाणे काढला आहे.

या आदेशावरून विरोधी राजकीय नेत्यांनी कल्याण डोंंबिवली पालिका प्रशासनावर टीकेचे झोड उठवली आहे. ओबीसी, मराठा, मराठी हिंदी, मराठी गुजराती असे अनेक प्रकारचे वाद पेटवून झाले आता उरले काय तर शाकाहरी मांसाहरी वाद तो पेटवून काय साध्य होते का ते पाहायचे ही शासनाची निती आहे. पालिकांमध्ये आता लोकप्रतिनिधी राजवट नाहीत. आयुक्त हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशाशिवाय असे लादणारे आदेश निघू शकत नाहीत, असे डाॅ. आव्हाड म्हणाले. आयुक्तांची याचे स्पष्टीकरण द्यावे, असे ते म्हणाले. आता शासनाकडे समाजात वाद पेटविण्यासाठी काही राहिलेच नाही म्हणून हा शाकाहरी मांसाहारीची ठिणगी टाकण्यात आली आहे, असा आरोप आव्हाडांनी केला.

खासदारांची टीका

कोणी काय खावे, खाऊ नये हा सर्वस्वी लोकांचा प्रश्न आहे. आगरी कोळी समाज हा समुद्र, खाडी किनारा भागात राहणार रहिवासी आहे. शाकाहरा बरोबर मांसाहार हे त्याचे अन्न आहे. त्यामुळे अशाप्रकारची बंदी कोणी आणू शकत नाही. राज्यातील विविध भागात ज्या चालीरिती आहेत त्याप्रमाणे प्रत्येक जण आपला आहार घेतो. अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली पालिकेने आणलेली मटण विक्रीवरील बंदी अनाकलनीय आहे, असे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.

कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निर्णयाला लोकांनी विरोध केला नाही. मग एक दिवस शाकाहार पाळण्यास काय हरकत आहे. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे, असे ते म्हणाले.