ठाणे : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची रम्मी हा ऑनलाईन गेम खेळतानाचा कथित चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर टिका होऊ लागले. राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार जितेंद्रआव्हाड यांनीही कोकाटे यांच्यावर टिका करत एक्स या समाजमाध्यमावर एक छायाचित्र प्रसारित केले आहे. त्यामध्ये कोकाटे यांच्या हातात रम्मी गेम खेळतानाचा मोबाईल दाखविला असून शेतकऱ्यांनो विसरा शेती, खेळा रम्मी असे म्हटले आहे. तसेच कोकाटे यांचा उल्लेख रम्मी मास्टर असा केला आहे. हे छायाचित्र सर्वत्र प्रसारित होत आहे.

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची एक कथित चित्रफीत प्रसिद्ध होत आहे. राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) रोहीत पवार यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये ही चित्रफीत प्रसारित केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या चित्रफीतीमध्ये रोहीत पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. तसेच ‘सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?’ अशी टिका त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही चित्रीफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर आता कोकाटे यांच्यावर सर्वच स्तरातून टिका होऊ लागली आहे. शेतकऱ्यांकडून ही पोस्ट मोठ्याप्रमाणात प्रसारित केली जात असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जाब ते सत्ताधाऱ्यांना विचारत आहेत. त्यानंतरआता आव्हाड यांनी थेट कोकाटे यांचे छायाचित्र तयार केले. त्यामध्ये कोकाटे यांनी डोक्यावर फेटा बांधला असून त्यांच्या एका हातामध्ये मोबाईल दाखविला आहे. त्यावर ऑनलाईन रम्मी गेम ॲपचे चित्र आहे. आव्हाड यांनी या एक्स पोस्टमध्ये अत्यंत कठोर शब्दांत टिका केली आहे. त्यात त्यांनी कोकाटे यांचा रम्मी मास्टर कृषिमंत्री असा उल्लेख केला आहे. तर विसरा शेती… खेळा रम्मी… मिळणार नाही शेतमालाची हमी असा उल्लेख केला आहे. आव्हाड यांची ही पोस्ट समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. या पोस्टवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवित आहेत. तर काहीजण ही पोस्ट रीपोस्ट करत आहेत.