ठाणे : राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सोमवारी सकाळी ठाणे महापालिका मुख्यालयात जनसंवाद अभियान राबविण्यासाठी जात असताना, पालिका मुख्यल्याजवळील सर्कल येथे थांबलेल्या एका कार्यकर्त्याने आव्हाडांची भेट घेतली. त्याचवेळी त्याने नवीन घेतलेली रिक्षा चालविण्याची इच्छा व्यक्त करताच आव्हाड त्यांच्या वाहनातून खाली उतरले आणि कार्यकर्त्यांच्या रिक्षाचे सारथ्य करत महापालिका मुख्यालयात गेले.
ठाणे महापालिका मुख्यालयातील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात सर्वच राजकीय पक्षांकडून जनसंवाद कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. अशाचप्रकारे सोमवारी दुपारी १२.३० वाजता राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाने महापालिका मुख्यालयातील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार ) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या वाहनाने पालिका मुख्यालयात जात होते. त्यांचे वाहन पालिका मुख्यालयाजवळील सर्कल येथे आले. त्यावेळी तिथे घोडबंदर येथील ब्रह्मांड परिसरातील माता रमाई नगरमध्ये राहणारा शिवाजी सिद्धार्थ वाघमारे हा कार्यकर्ता उभा होता. त्याने नवीन रिक्षा घेतली होती, ती त्याला आव्हाड यांना दाखवायची होती. त्याने आव्हाड यांचे वाहन थांबवून त्यांना रिक्षा घेतल्याचे सांगितले आणि ती रिक्षा चालविण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या इच्छेखातर आव्हाड यांनी वाहनातून खाली उतरून कार्यकर्त्यांच्या रिक्षाचे सारथ्य करत महापालिका मुख्यालयात गेले. आव्हाड हे रिक्षा चालवित आल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि त्याचीच चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.
कार्यकर्ता हीच आपली ताकद आहे, असे सर्वच राजकीय नेते म्हणत असतात. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावनांना विशेष महत्व देऊन त्यांच्या सुख – दुःखात सहभागी होणारे नेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ओळख आहे. त्याचा प्रत्यय सोमवारी ठाणे महानगर पालिका मुख्यालयात आला. माता रमाई नगर, तुर्फे पाडा, ब्रम्हांड येथे राहणारा शिवाजी सिद्धार्थ वाघमारे हा तरूण स्विगीमध्ये डिलीव्हरी बाॅय म्हणून काम करीत होता. नुकतीच त्याने रिक्षा घेतली. सोमवारी या रिक्षाची डिलीव्हरी मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना आपली नवीन रिक्षा दाखविण्यासाठी तो ठाणे महानगर पालिकेजवळ आला. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे आपल्या गाडीतून उतरताच तो पुढे आला अन् आपण रिक्षा घेतलीय, असे सांगितले. त्यावेळेस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी रिक्षाच्या ड्रायव्हर सिटवर बसून चक्क रिक्षा चालविली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माझी नवीन रिक्षा चालवावी, अशी माझी इच्छा होती आणि तशी मी त्यांना बोलून दाखवली. मला वाटलं नव्हतं की, ते खरोखर ती इच्छा पूर्ण करतील. परंतु त्यांनी माझी रिक्षा चालवून माझी इच्छा पूर्ण केली, एक कार्यकर्ता म्हणून खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवाजी सिद्धार्थ वाघमारे यांनी व्यक्त केली.