कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन

ठाणे जिल्ह्य़ातील पक्षातील मातब्बर नेते एकामागून एक पक्षाला सोडचिठ्ठी देऊ लागल्याने जिल्ह्य़ातील पक्षाचा चेहरा बनलेले कळवा-मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी ठाण्यात ठाण मांडल्याचे पाहायला मिळाले. आव्हाडांचा अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित मिरवणुकीत पवार दोन तासांहून अधिक काळ सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर पवार यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी लढवावी म्हणून स्थानिक नेत्यांसोबत चर्चाही केल्याचे समजते.

शिवसेनेचे बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ात काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तोडीस तोड ताकद निर्माण केली होती. मात्र भाजपच्या लाटेत राष्ट्रवादीतील मातब्बरांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला किसन कथोरे, कपिल पाटील यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर अगदी अलीकडे गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील पवारांची साथ सोडली. अशा वेळी जितेंद्र आव्हाड हा पक्षाचा एकमेव मोठा चेहरा उरला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या उमेदवारी अर्ज मिरवणुकीच्या माध्यमातून पवार यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.  कार्यकर्त्यांच्या वाहनांचा ताफा आणि गर्दी यामुळे मुंब्य्रातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी झाली होती.

छत्री नाकारली..

सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेल्या मिरवणुकीत उन्हाचा पारा वाढू लागल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी रथावर असलेल्या पवार यांना छत्री देऊ केली. मात्र ती नाकारत पवार उन्हातच कार्यकर्त्यांना अभिवादन करत पुढे निघाले.

आज अर्ज दाखल

या मिरवणुकीदरम्यान उन्हामुळे एका नगरसेवकाला चक्कर आली तर अनेक नगरसेवक अर्ज भरण्यासाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे आव्हाड यांनी अर्ज दाखल केला नाही. आज, शुक्रवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वृत्तास आव्हाड यांनी दुजोरा दिला आहे.