ठाणे: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरे बंधूंचा मेळावा होताच, एक सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतानाचा एक व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत या लढ्यात आपण सगळे मराठी लेकरं म्हणून रिंगणात उतरु असे म्हटले आहे. दोन्ही बंधू एकत्र पाहून मराठी माणूस सुखावला असाही उल्लेख त्यांनी केला.
विजयी मेळाव्यासाठी वरळी येथे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसले. या मेळाव्यास मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांसह विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये शरद पवार गटाचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच आव्हाड हे या कार्यक्रमात विशेष उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी देखील आव्हाड यांचा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला होता. त्यानंतर आव्हाड यांनी व्यासपीठावर जाऊन सर्वांचे आभार मानले. तसेच एक्स या समाजमाध्यमावर एक ट्विट केले आहे.
ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे पाहून या मातीतील तमाम मराठी माणूस सुखावला असणार आहे. माय मराठीच्या सन्मानार्थ उभा राहत असलेल्या या लढ्यात आपण सगळेच, मराठी लेकरं म्हणून रिंगणात उतरु असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी हॅशटॅगचा वापर देखील केला आहे. यात ‘महाराष्ट्रात मराठीच’ असा उल्लेख आहे.