बाधितांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी सुसज्ज रिक्षा; सिटिझन फोरम, नागरिक मंडळाचा उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ : करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची तब्येत एकाएकी बिघडण्याचे आणि प्राणवायूची पातळी कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेची वाट पाहता पाहता अनेकदा रुग्णांची स्थिती गंभीर होत असल्याचे दिसून आले होते. त्यावर उपाय म्हणून अंबरनाथ शहरात विविध नागरिक मंचाच्या माध्यमातून ठाणे वाहतूक पोलिसांच्या मदतीने रिक्षा रुग्णवाहिकांची निर्मिती करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेत असलेल्या प्राणवायूपासूनच्या सुविधा या रिक्षात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सामान्य रिक्षाचे दर यात लागू राहणार असून पहिल्या टप्प्यात शहरात २५ रिक्षा उपलब्ध झाल्या आहेत. करोनाच्या संसर्गाच्या सर्व काळजी घेण्याबाबतचे प्रशिक्षणही चालकांना देण्यात आले आहे.

अंबरनाथ सिटिझन फोरम यांच्या संकल्पनेतून आणि नागरिक सेवा मंडळ यांच्या सहकार्याने अंबरनाथमध्ये रिक्षा रुग्णवाहिका सुरू करण्याबाबत चर्चा झाली. दुसऱ्या लाटेत करोनाबाधितांची संख्या एकाएकी बिघडत असल्याचे दिसून आले होते. रुग्णवाहिकांची संख्या आणि त्यांची पोहोच मर्यादित असल्याने अनेकदा रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी वाट पाहत बसावी लागत होती. रुग्णालयात जाण्यास विलंब होत असल्याने रुग्णाचा मृत्यू आणि रुग्ण गंभीर होण्याचे प्रकारही वाढले होते. त्यावर रिक्षा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यासाठी अंबरनाथ सिटिझन फोरमकडून वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना विनंती करण्यात आली. त्यांनी रिक्षात काही सुरक्षाविषयक बदल करण्यास आणि वाहतुकीस परवानगी दिली. त्यानंतर फोरमच्या वतीने रिक्षा संटनांच्या सदस्यांनी चर्चा करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यातून शहरात ५० रिक्षाचालक पुढे आल्याची माहिती अंबरनाथ सिटीझन फोरमचे धनंजय मूल्या यांनी दिली आहे. शहरातील ब्रिलियंट पॉलीमर्स या कंपनीने प्रायोजकत्व स्वीकारले. सुरुवातीला २५ रिक्षा तयार करण्यात आल्या. रिक्षात चालकासाठी पीपीई किटपासून इतर सर्व सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रिक्षाचालकाला रुग्ण रिक्षात बसवणे आणि उतरवणे, यात घ्यायची काळजी याबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याचे मूल्या यांनी सांगितले आहे. अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगर भागात सिटिझन फोरमच्या सत्यजीत बर्मन यांच्याकडून निर्जंतुक आणि इतर साधने चालकांनी घ्यायची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात उतरवल्यानंतर रिक्षा निर्जंतुक केली जाते.  ही रिक्षा सामान्य रिक्षांचे भाडेच आकारणार असून प्राणवायूचा वापर झाल्यास त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. या जीवदानी रिक्षा रुग्णवाहिकांमुळे अबंरनाथ शहरातील नागरिकांना रुग्णवाहिकांची वाट पाहण्याची गरज राहणार नाही. शहरातल्य शहरात रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठी या रिक्षा रुग्णवाहिका फायदेशीर ठरणार आहेत.

प्राणवायूही उपलब्ध

रिक्षात प्राणवायूची छोटी बाटली उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णाला अचानक श्वास घेण्यास त्रास झाल्यास या बाटलीद्वारे त्याला सुमारे ३५० श्वास देता येतील. तोपर्यंत तो रुग्णालयात पोहोचू शकेल असेही धनंजय मूल्या यांनी सांगितले आहे. शहराचे पाच विभागांत वर्गीकरण करण्यात आले असून नागरिकांसाठी संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात प्रत्येक चार तासांसाठी एक सदस्य फोनवर उपलब्ध असेल. हेल्पलाईन क्रमांक – ८२८६३००३००/८२८६४००४००.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jivdani rickshaw ambulance in ambernath zws
First published on: 21-05-2021 at 02:03 IST