पी. सी. टेक्नॉलॉजी कंपनीकडून प्रत्येकी २५ हजारांची लूट; देशभरात पाच ते सहा हजार जणांना कोटय़वधींना फसवले
तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम घेऊन पी. सी. टेक्नॉलॉजी या खासगी कंपनीने आठशेहून अधिक तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. १५ ऑगस्ट तसेच इतर सणांचे निमित्त साधून कंपनी व्यवस्थापनाने तरुणांना दहा दिवसांची सुट्टी दिली होती. सुट्टी संपल्यामुळे सोमवारी सर्वच तरुण कंपनीत कामावर आले असता कंपनी बंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे संतापलेल्या तरुणांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, विविध राज्यांत अशाच प्रकारे पाच ते सहा हजार जणांना फसवून या कंपनीने कोटय़वधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
सुट्टीच्या नावावर कंपनीला टाळे
कंपनी व्यवस्थापनाने १५ ऑगस्टपासून सलग दहा दिवस कंपनीतील सर्वाना सुट्टी दिली. इतकी मोठी सुट्टी देण्यात आल्यामुळे अनेकांनी विचारणाही केली. त्या वेळी १५ ऑगस्ट तसेच सणानिमित्त ही सुट्टी असल्याचे सांगण्यात आले. दहा दिवसांची सुट्टी संपल्यानंतर सोमवारी सकाळी सर्वच तरुण कामावर हजर झाले. मात्र, कंपनीच्या प्रवेशद्वारावरील फलक पाहून अनेकांना धक्का बसला. जागेचे भाडे तसेच देखभाल व दुरुस्तीची रक्कम थकविल्यामुळे कंपनीला सील ठोकण्यात आले आहे, अशा आशयाचे फलक प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. त्यानंतर विविध राज्यात असलेल्या कंपनीच्या कार्यालयांशी तरुणांनी संपर्क साधला असता, तिथेही असाच प्रकार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. तीन महिने प्रशिक्षणाच्या काळातील पैसेही मिळाले नाहीत आणि नोकरीही मिळाली नाही. याशिवाय, २५ हजार रुपये अनामत रक्कमही बुम्डाली.
विविध राज्यांत फसवणूक
मुंबई, पुणे या शहरांसह बंगळूर, डेहराडून, विशाखापट्टणम, कोलकाता या राज्यात पी. सी. टेक्नॉलॉजी कंपनीची कार्यालये आहेत. ठाण्यातील कंपनीत ८७६ तर देशभरात पाच हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना १२ ते १५ हजार रुपये इतका पगार मिळणार होता. १५ ऑगस्टपासून व्यवस्थापनाने कंपनी बंद केली आहे. तसेच कंपनीतील मनुष्यबळ विकास अधिकारी यांनी आठवडय़ाभरापूर्वीच नोकरी सोडली आहे. आता नेमका कुणाशी संपर्क साधावा, याबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती फसवणूक झालेली तरुणी प्रियंका शेलार हिने
नेमका प्रकार काय?
ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील ‘अशर’ आयटीपार्कमध्ये पी. सी. टेक्नॉलॉजी नावाची संगणक प्रणाली विकसित करणारी कंपनी आहे. या कंपनीने गेल्या वर्षी नोकर भरती प्रक्रियेसाठी जाहिराती काढल्या होत्या. या तरुणांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार होते. त्यासाठी त्यांच्याकडून २५ हजार रुपये अनामत रक्कम कंपनी व्यवस्थापनाने घेतली होती. यात काही महाविद्यालयातून नुकताच अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना महाविद्यालयामार्फतच ही नोकरी मिळाली होती. प्रशिक्षणाच्या कालावधीतही त्यांना ६ ते ७ हजार रुपये इतके मानधन देण्यात येणार होते. मात्र मानधनाची रक्कमही तरुणांना देण्यात आली नाही.