ठाणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. असे असतानाच पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यात आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली आहे. तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ठाणे पालिकेची निवडणुक होईल, असे अंदाज वर्तविले जात होते. परंतु अद्यापही पालिकेची निवडणुक जाहीर झालेली नाही. असे असले पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. असे असतानाच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण व मतदार याद्यांचे काम पूर्ण केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे.
बहुधा निवडणुका पावसाळ्यानंतरच घेतल्या जातील, असे संकेत आहेत. यामुळे ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले असून कळव्यातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. या सर्वांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अजित पवार गट प्रयत्नशील होता. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश आले नव्हते. असे असतानाच, पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यात आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली आहे. तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
चौकटराष्ट्रवादी पक्षात फूट पडून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. त्यावेळी आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांची साथ दिली. अजित पवार यांनी आनंद यांच्याकडे ठाणे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. तर, मुल्ला यांना प्रदेश सरचिटणीस पद दिले होते. तेव्हापासून आनंद हेच जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करत होते. मात्र, पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.