कल्याण – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या ३७ कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये आठ नव्याने भरती करण्यात आलेले कर्मचारी हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, कर्मचारी यांचे नातेवाईक आहेत. या नोकर भरतीत गैरप्रकार करून, नोकर भरतीचे सर्व शासकीय नियम धुडकावून संचालक मंडळ काळात करण्यात आलेली ही नोकर भरती प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय करणारी असल्याने बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरतीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिेले आहे.

या याचिकेत याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मागील २५ वर्षापासून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोकर भरती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या नोकर भरतीमध्ये बाजार समितीच्या संचालकांनी संगनमत करून आपले नातेवाईक नोकरीला लावले आहेत. कल्याण बाजार समितीमधील नोकर भरतीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. या नोकर भरतीसाठी राज्याच्या विविध भागातून एकूण सात हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी करून ३३ उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. या नोकर भरतीमध्ये आठ उमेदवार हे बाजार समितीमधील संचालक, कर्मचारी यांचा मुलगा, सून, भाचा, पुतण्या यांचा समावेश आहे, असे मयूर पाटील यांनी सांगितले.

बाजार समिती संचालक मंडळाची मुदत २७ सप्टेंबर २०२३ रोजी संपली होती. शासनाकडून तात्पुरती मुदत वाढ मिळविण्यात समितीमधील काही संचालकांना यश आले. ही मुदत वाढ मिळवताना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास समितीला मज्जाव करण्यात आला होता. तरीही घाईने ३७ जागांसाठी नोकर भरतीचा घाट घालण्यात आला. शासनाला अंधारात ठेऊन अधिकारांचा गैरवापर करत ही नोकर भरती करण्यात आली आहे. या नोकर भरतीमधील काही उमदेवारांची नियुक्ती पत्रे ही संचालक मंडळ काळात, तर काही नियुक्ती पत्रे ही प्रशासकीय राजवटीत दिली आहेत. या नोकर भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आहे. ही नियमबाह्य पध्दतीने ही नोकर भरती झाल्याने, संचालकांनी आपल्या नातेवाईकांचा भरणा या नोकर भरतीत करून प्रामाणिक खऱ्या इच्छुक उमेदवारावर अन्याय कला आहे, असे माजी संचालक मयूर पाटील यांनी सांगितले.

नातेवाईक, कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता पात्र पदासाठी आहेत का, असा चौकशीचा विषय आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यासाठी आपण उच्च न्यायालयात बाजार समिती नोकर भरती विरुध्द याचिका दाखल केली आहे, असे मयूर पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भात बाजार समिती संचालक मंडळ, प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने प्रतिक्रिया देण्यास विरोध केला. ३३ उमेदवारांना नियुक्त्या देऊन सहा महिने झाले आहेत. या नोकर भरतीला अनुज शिवाजी गोंधळे यांनीही आव्हान दिले आहे.

संचालक नातेवाईक उमेदवारअजय काशिनाथ खंदाळे, राजनिकालांत कुटे, दनेश चंद्रकांत धुमाळ, संगीता आव्हाड, अश्विनी चौधरी, रमेश भोंडविले, प्रेरणा विशे, भाग्यश्री देशमुख हे नवनियुक्त कर्मचारी बाजार समिती संचालक, कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे मयूर पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे.