कल्याण – कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील रामबाग येथील ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांचे विजय तरूण मंडळ गणेशोत्सव काळात कोणता देखावा उभारणार याकडे पोलीस, नागरिक यांचे विशेष लक्ष असते. देश, राज्यातील वास्तवदर्शी घडामोडी ते आपल्या गणेशोत्सवातील देखाव्यात उभारतात. यावेळी विजय तरूण मंंडळाने काश्मीरमधील पहलगाम बैसरण टेकडी येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गेलेले २६ पर्यटकांचे जीव आणि या हल्ल्याच्यावेळी समोर पती दहशतवाद्यांचा बळी ठरलेला. अशावेळी एका निष्पाप असाहाय्य स्त्रीने आपल्या मनातील उद्वेजनक भावना दृकश्राव्य ध्वनी चित्रणातून मांडली आहे.
दरवर्षीचा विजय तरूण मंडळाचा देखावा राजकीय, सामाजिक प्रक्षोभक चित्र, देखाव्यांमुळे कायद्याच्या कचाट्यात अडकतो. पोलीस या देखाव्याला हरकत घेतात. मग हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहचते. तेथून परवानगी घेऊन देखाव्यातील काही आक्षेपार्ह भागांमध्ये काटछाट करून मग या मंडळाचा गणेशोत्सव साजरा होतो, असे मागील काही वर्षापासुनचे चित्र आहे.
उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांच्या संकल्पनेतून हे देखावे साकारले जातात. गेल्या एप्रिलमध्ये काश्मीरमधील पहलगा बैसरण टेकड्यांवर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील २६ पर्यटकांना दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घालून ठार केले. यात डोंबिवलीतील तीन पर्यटक कुटुंब होती. आपल्या समोर आपल्या कुटुंबप्रमुख पतीला मारले जात आहे. संसारी जीवनाची नव्याने वाटचाल करणारी एक नवविवाहिता आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ असाहाय्य होऊन बसलेली. असे हकनाक जीव दहशतवाद्यांनी घेतले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला, त्यांंची लहान मुले यांच्या मनाची झालेली तगमग, अस्वस्थता. भारत सरकारचे अपयश आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रृटी या देखाव्यातून मांडण्यात आल्या आहेत.
मनोगत
मी… मी… एक असाहाय स्त्री… मी आणि माझे पती, मोठ्या आनंदाने पेहेलगामला पर्यटनासाठी गेलो होतो… पण अतिरेक्यांनी माझ्या डोळ्यांसमोरच माझ्या पतीला गोळ्या घालून ठार केलं… आणि त्या परिस्थितीत आमच्या मदतीला कोणीच आलं नाही. कोणीच नाही ! माझ्या डोळ्यांसमोर माझ्या कपाळावरचं कुंकू कायमचं पुसलं गेलं… माझ्या सौभाग्याचं लेणं असलेल्या माझ्या सिंदूरचं रक्षण भारत सरकार नाही करू शकलं ! हो भारत सरकार आमचं रक्षण करू शकलं नाही… खरंतर याच भारत सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास ठेवून, आनंद लुटायला, सुख उपभोगायला गेलो होतो आम्ही तिथे… पण काय झालं? परत येताना माझ्या पतीचं प्रेत घेऊन परत यावं लागलं मला… एका क्षणात माझं कुटुंब, माझा संसार उध्वस्त झाला… कोणामुळे? अशा या आम्हा महिलांच्या सिंदूरचे रक्षण करण्यात, असमर्थ ठरलेल्या भारत सरकारचा मी ठाम निषेध करते..! आणि राष्ट्र प्रेमापोटी प्रार्थना करते…
देशभक्ती – आपल्या देशाबद्दलचं निस्वार्थ प्रेम, अभिमान आणि समर्पणाची भावना आहे… अशी एक भावना, जी तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्याच मनात वास करते. आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल आणि इतिहासाबद्दल गर्व करायला शिकवते..! आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, रक्षणासाठी आणि सेवेसाठी आपल्याला कायम प्रेरणा देत असते..! मी एक देशभक्त आहे आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी आणि अशा बलिदानासाठी मी तयार आहे..! माझं दुःख नक्कीच मोठं आहे, पण त्याहीपेक्षा मोठा माझा देशाभिमान आहे..!हे गणराया, आमचे सरकार, आम्हा निष्पाप नागरिकांचे, या हिंसक पशूंपासून रक्षण करू शकत नाही. आणि म्हणून तूच ह्या हिंसक राक्षसी प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या रूपाने या धर्तीवर धावून ये… धावून ये… गणराया आमचे रक्षण कर..! हीच तुला हात जोडून प्रार्थना…!