पुनर्बाधणीसाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्याचा निर्णय

अतिशय दुर्दशा होऊनही गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी या सदैव गजबजलेल्या एसटी आगारांच्या पुनर्बाधणीला आता वेग आला आहे. या दोन्ही बसस्थानकांचे छप्पर धोकादायक बनले असल्याने त्याची दुरुस्ती करण्याची गरज स्थानक व्यवस्थापकांनी बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार या स्थानकांच्या पुनर्बाधणीसाठी वास्तुविशारद नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण बस स्थानक आणि भिंवडी बस स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी असते. या दोन्ही आगारांतून राज्यभरात एसटीच्या गाडय़ा सुटतात. त्यामुळे सणासुदी तसेच सुटीच्या कालावधीत या आगारांत प्रवाशांची मोठी गर्दी असते. परंतु, या दोन्ही बसस्थानकांची अवस्था मात्र अतिशय दयनीय झाली आहे. कल्याण आगार स्थानकाची अतिशय बिकट अवस्था असून येथील खांब केव्हाही कोसळेल अशा अवस्थेत आहे. तर भिवंडी आगारातील परिस्थितीही वेगळी नाही. या दोन्ही आगारांची पुनर्बाधणी करण्याचे प्रयत्न गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू होते. मात्र, सरकारी पातळीवर याबाबतचे प्रस्ताव पुढे सरकत नव्हते. परंतु, आता या दोन्ही स्थानकांच्या पुनर्बाधणीला हिरवा कंदील मिळाला आहे.

आगार व्यवस्थापकांच्या प्रस्तावानुसार बांधकाम विभागाने या दोन्ही स्थानकांच्या पुनर्बाधणीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात वास्तुविशारदकाच्या नेमणुकीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेनंतर नेमण्यात आलेल्या वास्तुविशारदकाने सहा महिन्यांत पुनर्बाधणीची सविस्तर योजना आखून द्यावी, अशी अट या निविदेचे टाकण्यात आली आहे. दरम्यान, पुनर्बाधणीचा सविस्तर आराखडा हाती येताच त्या दृष्टीने तातडीने पाऊल उचलले जाईल, अशी माहिती एस.टी. बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता संजय नालमवार यांनी दिली. भिवंडी आगार तब्बल ३५ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात आगाराची जागा असून कल्याणचे आगारही १९ हजार २०० चौरस मीटर क्षेत्रफळात विखुरले आहे. त्यामुळे पुनर्बाधणीनंतर या ठिकाणी सुसज्ज असे बस स्थानक उभे राहू शकेल, असा दावा नालमवार यांनी केला. वास्तुविशारदातर्फे ठरविण्यात आलेल्या योजनेनुसार ते ठरविण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

आगारातून रोज सुटणाऱ्या गाडय़ा

  • ५१४ कल्याण
  • ८०० भिवंडी