कल्याण : भाजप प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यापासून डोंंबिवलीचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कल्याण, डोंबिवलीतील विविध भागातील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. दोन दिवसापूर्वी कल्याणमधील कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून या शहारांना लागलेले विकासाचे ग्रहण सोडविण्यासाठी, विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकवर भाजपचा महापौर बसविण्याचे आवाहन केले.

तसेच, कल्याण, डोंबिवली परिसर भाजपमय करण्याचे आदेश दिले. प्रदेशाध्यक्षांच्या या हालचालींमुळे आगामी पालिका निवडणुकांवर डोळा ठेऊन भाजपने कल्याण डोंंबिवलीची सुभेदारी अर्थात महापौरपद ताब्यात घेण्याच्या व्यूहरचनेची तयारी केली असल्याचे समजते. मागील २५ वर्ष कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना भाजपची सत्ता राहिली. पालिकेवर आपली हुकमत ठेवण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नगरसेवकांच्या संख्याबळाच्या आधारे बाजी मारली. तोच शिरस्ता नंतर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पुढे चालविला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना दुभंगली. ठाकरे गट, शिंदे गट नावाने शिवसेना ओळखली जाते. या दोन्ही पक्षात स्थानिक पातळीवर कुरबुऱ्या आहेत. त्यामुळे दुंभगलेपणाचा लाभ स्थानिक पातळीसह राज्यस्तरावर मिळणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी मुख्यमंत्री पद भाजपकडे आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे रहिवासी आहेत. या संधीचा फायदा घेत महायुतीमधील पक्षांना न दुखावता भाजपच्या कल्याण, डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागातील इतर पक्षांमधील कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांना भाजपमध्ये घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी पालिका निवडणुकांमध्ये भाजपचा वरचष्मा राहील यादृष्टीने भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पक्ष, कार्यकर्ते वाढीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी पालिका निवडणुकीचा विचार करून कल्याण, डोंबिवलीत भाजप कार्यकर्ते कल्याणच्या सुभेदारीसाठी कामाला लागले आहेत, असे चित्र आहे.

कल्याण पूर्वेत भाजप आमदार सुलभा गायकवाड, कल्याण पश्चिमेत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आणि डोंबिवलीत स्वता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, २७ गावमध्ये जिल्हाध्यक्ष नंदू परब अशा विभागणीतून डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, २७ गाव या विभागवार पध्दतीने भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याचे काम भाजपने सुरू केले आहे. ही कामे करताना राज्य सत्तेमधील मित्र दुखवणार नाहीत याचीही काळजी घेतली जात आहे. भाजपसमोर आव्हान उभे करण्याच्या अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात भाजपकडून कार्यक्रम लावले जात आहेत.

कल्याण ग्रामीणमध्ये विकास कामे, नागरी समस्यांवरून मनसे नेते राजू पाटील यांंनी शिंदे शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप, मनसेचे डोंंबिवली, कल्याण ग्रामीणचे सख्य सर्वश्रृत आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी अन्य पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी कौटुंबिक, धार्मिक कार्यक्रमातून जवळीक वाढवण्यास सुरूवात केली आहे. या जवळीकीचा पक्षीय नातेसंबंध निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या शहरातील महापालिका भाजपच्या ताब्यात, याही सुत्राने कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे शहरात चित्र आहे.

केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेत भाजपची सत्ता आली तर या दोन्ही सत्तांच्या माध्यमातून पालिकांमध्ये विविध प्रकारची विकास कामे आणणे, राबविणे शक्य होणार आहे. यासाठी आमचे पालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आहेत. नंदू परब जिल्हाध्यक्ष, भाजप कल्याण जिल्हा.