कल्याण – कल्याण मधील वालधुनी पुलावरून बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान खडकपाडा येथे राहणारा एक व्यापारी आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी या व्यापाऱ्याच्या पाठीमागून एक हेल्मेटधारी दुचाकीस्वार पाठलाग करत आला. त्याने काही कळण्याच्या आत व्यापाऱ्याच्या गळ्यातील दोन लाख ४० हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.
गेल्या महिनाभरापासून कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागात दुचाकीवरून येऊन पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे एक ठराविक टोळी हे प्रकार करत असल्याचा पोलिसांना संशय असून पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला पुरूषांना हे चोरटे लक्ष्य करत आहेत. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात राजू आसरानी (६४) हे व्यापारी राहतात. रात्रीच्या वेळेत आपली दिवसभराची व्यापाराची उलाढाल पूर्ण करून तक्रारदार व्यापारी राजू आसरानी बुधवारी रात्री गणेशघाट वालधुनी नदी पुलावरून दुचाकीवरून घरी चालले होते. पुलावर पावसामुळे निसरडे झाले असल्याने राजू आसरानी यांनी दुचाकीचा वेग कमी ठेवला होता.
पुलावरून जात असताना अचानक व्यापारी आसरानी यांच्या पाठीमागून एक दुचाकी स्वार आला. त्याने डोक्यात हेल्मेट घातले होते. तो आपणास मागे टाकून पुढे जाईल असे राजू यांना वाटले. त्यांनी आपली दुचाकी थोडी बाजुला घेऊन पाठीमागून येत असलेल्या दुचाकी स्वाराला पुढची वाट करून दिली.
पाठीमागून येत असलेल्या दुचाकी स्वाराने अचानक आपली दुचाकी राजू आसरानी यांच्या दुचाकीच्या दिशेने नेऊन एका हाताने राजू यांच्या गळ्यातील होलो जंजीर कलाकृतीची जुन्या ठेवणीची दोन लाख ४० हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी जोराने खेचली. आपल्या गळ्यातील सोनसाखळी खेचली जात आहे हे लक्षात येताच राजू यांनी दुचाकीचा वेग कमी केला. दुचाकीच्या हॅन्डलचा एक हात सोडून चोरट्या दुचाकी स्वाराला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
परंतु, चोरट्याने आक्रमक भूमिका घेऊन जोराने राजू यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसका दिला. तो काही क्षणात पुलावरून सोनसाखळी घेऊन पळून गेला. राजू यांनी तात्काळ आपली दुचाकी वळून चोरट्या दुचाकी स्वाराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत चोरटा पळून गेला होता. या कालावधीत पुलावर वर्दळ नसल्याने त्याचा गैरफायदा चोरट्याने उचलला. राजू आसरानी यांनी या चोरीप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके याप्रकरणाचा तपास करत आहेत.