कल्याण – कल्याण मधील चिकणघर येथील म्हाडा नियंत्रित रखडलेल्या शांतीदूत सोसायटी पुनर्विकास प्रकरणी लवकरच एक बैठक मुख्यमंत्र्यांसमवेत आयोजित केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार किसन कथोरे, आमदार महेश चौगुले यांच्यामार्फत या सोसायटीच्या रहिवाशांसमवेत बेमुदत उपोषणास बसलेल्या माजी आमदार नरेंद्र पवार यांना दिले. त्यामुळे पवार यांनी आपले बेदमुदत उपोषण मंगळवारी स्थगित केले.
तर, या रखडलेल्या शांतीदूत गृहप्रकल्पाचे विकासक श्रीकांत शितोळे यांनी या प्रकल्पाच्या आवश्यक तांत्रिक परवानग्या पूर्ण झाल्या आहेत. या प्रकल्पासंदर्भात राज्य, केंद्र स्तरावरील नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे. हा गृह प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने आपण प्रयत्नशील आहोत. हा प्रकल्प काही आर्थिक अडथळे, तांत्रिक अडचणींमुळे रखडला. यामुळे रहिवाशांंना झालेल्या त्रासाची आपणास माहिती आहे. या गृहप्रकल्पातील बहुतांशी रहिवासी आपल्या पाठीशी आहेत. हा विषय उपस्थित करण्यापूर्वी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्याशी चर्चा केली असती तर या गृहप्रकल्पाची सविस्तर माहिती आपणास त्यांना दिली असती. आता शांतीदूत गृहप्रकल्प उभारणीच्या आवश्यक परवानग्या पूर्ण होत आल्या आहेत. लवकरच हा गृहप्रकल्प आकाराला येईल यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.
चिकणघर येथील शांतीदूत सोसायटीतील रहिवाशांच्या पुढाकाराने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी चिकणघर येथील शांतीदूत गृह प्रकल्प भागात बेमुदत उपोषण उपोषण सुरू केले होते. या सोसायटीतील रहिवाशांना न्याय मिळाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार पवार यांनी केली होता. सोसायटीतील अनेक रहिवासी या उपोषणात सहभागी झाले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी व्याधीग्रस्त उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळण्यास सुरूवात झाली होती. नरेंद्र पवार यांनाही त्रास सुरू झाला होता. त्यामुळे वैद्यकीय पथकांनी उपोषणकर्त्यांना वैद्यकीय उपचाराच्या सूचना केल्या होत्या.
शांतीदूत रखडलेल्या गृहप्रकल्पा संदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहिले होते. हा रखडलेला प्रकल्प आणि त्यामुळे रहिवाशांचे होणार हाल याविषयीची माहिती दिली होती. या रहिवाशांना शासनाने न्याय देण्याची मागणी केली होती. भाजपचे माजी आमदार रहिवाशांचा प्रश्न घेऊन उपोषणास बसल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मंगळवारी आमदार कथोरे, महेश चौगुले यांनी पवार यांच्याशी उपोषणस्थळी चर्चा केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. या नेत्यांंनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीचे आश्वासन पवार यांना दिले. त्यानंतर पवार यांनी उपोषण स्थगित केले. बैठकीतील चर्चेत समाधान झाले नाहीतर आपण पुन्हा उपोषण करू असे संकेत पवार यांनी दिले आहेत. विकासक शितोळे यांनीही हा गृहप्रकल्प लवकर आकाराला येईल यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत, असे माध्यमांना सांगितले.