कल्याण – १९५७, १९६० आणि अलीकडच्या काळात २००५ मध्ये कल्याण शहराला महापुराने सर्वाधिक मोठा फटका दिला. मुसळधार पावसाच्या उल्हास खोऱ्याच्या पायथ्याशी आणि उल्हास नदी काठी कल्याण शहर वसले आहे. नदी पाणी पातळी आणि शहर भुपृष्ठ पातळी एक समान पातळीवर असल्याने उल्हास नदी दुथडी वाहू लागली की कल्याण शहर पुराच्या वेढ्यात अडकते, अशी माहिती कल्याण शहराच्या इतिहासाचे अभ्यासक डाॅ. श्रीनिवास साठे यांनी दिली.

इतिहासकालीन कल्याण शहराचा मूळ भौगोलिक भूभाग हा पारनाका, टिळक चौक, रामबाग परिसर हाच होता. विरळ वस्ती असे कल्याण शहराचे मूळ स्वरुप होते. १९५७ मध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना कल्याण शहरात मोठा पूर आला होता.

अनेक लोकांच्या घरात पाणी गेले होते. पुराचे पाणी कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत पोहचले होते. रस्त्यांची संख्या कमी, वाहने कमी त्यामुळे पायी प्रवास हेच लोकांचे साधन होते. महापुराच्या काळात टांगेवाला पुराच्या भीतीने गायब होता.

काही नावाड्यांनी आपल्या बोटी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात तैनात ठेवल्या होत्या. हे नावाडी कल्याण रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या कल्याण मधील प्रवाशाला आपल्या बोटीत बसवून इच्छित स्थळी सोडत होते. भाडे आणे दराने घेतले जात होते. कल्याण मधील नागरिकाला कल्याण रेल्वे स्थानकात जायाचे असेल तर आपल्या घराच्या दारावरून जाणाऱ्या नावाड्याला थांबण्याचा इशारा करून मग त्या बोटीत बसून नागरिक रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करत होते, असे अभ्यासक डाॅ. साठे यांनी सांगितले.

१९५७ चा पूर येण्यापूर्वी शिवाजी चौकात मनोरा, त्यावरील घड्याळ नुकतेच बसविण्यात आले होते. मनोऱ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा संगमरवरी दगडातील देखणा पुतळा बसविण्यात आला होता. महापुराच्या काळात शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावरील दाढीपर्यंत पुराचे पाणी लागले होते. पुराच्या पाण्याच्या या उंचीवरून कल्याणचे नागरिक दूरवरून शिवाजी चौकातील पाण्याच्या पातळीचा तर्क लढवित होते. नगरमंदिराची इमारत नव्याने उभ्या राहिलेल्या इमारतीत पुराचे पाणी शिरले होते. या इमारतीत पाणी शिरल्याने ग्रामस्थांना रुखरुख लागली होती. सार्वजनिक वाचनालयाच्या बैठ्या इमारतीच्या पायऱ्यांना पुराचे पाणी लागले होते, असे अभ्यासक डाॅ. साठे सांगतात.

१९६० मध्ये पुन्हा पूर आला. कल्याण शहर पुराने वेढले होते. शिवाजी चौकात होड्या फिरत होत्या. मुसळधार पावसाने ही परिस्थिती निर्माण केली होती. एकदा येऊन गेलेला पूर पुन्हा आठ दिवसाच्या अंतराने आला होता. दुसरा पूर आला त्यानंतर आठ दिवसांनी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार होता. पूर कमी झाला नाहीतर गणपती आणायचे कसे, विसर्जन शिवाजी चौकात करायचे का, असे प्रश्न ग्रामस्थ गमतीने करत होते. आताही आठवड्यावर गणेशोत्सव आल्यावर पूर आला आहे. २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या पुराचे सर्व साक्षीदार आहेत. या पुराने कल्याण शहराची कधी नव्हे ती दाणादाण उडवली होती. जीवित, वित्तहानी सर्वाधिक झाली होती.