कल्याण – कल्याण पूर्वेतील एका रूग्णालयातील मराठी तरूणीला बेदम मारहाण करणाऱ्या परप्रांतीय गोकुळ झा याच्या भावाचा जामीन अर्ज बुधवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. गोकुळचा भाऊ रणजित भुलेश्वर झा याला न्यायालयाने जामीन मंजूर केला तर तो बाहेर येऊन पुन्हा माझ्यासह माझ्या कुटुंबाला घातपात करील. तपास यंत्रणेवर दबाव आणून साक्षीदार, पंच फितूर करण्याची भीती पीडित मराठी तरूणीने मंगळवारी एका सत्यप्रतिज्ञा पत्राव्दारे न्यायालयात व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यापासून गोकुळ झाचा भाऊ रणजित भुलेश्वर झा याला जामीन मिळावा म्हणून झा कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. मराठी तरूणीला कल्याण पूर्वेतील श्री बालचिकित्सालयात बेदम मारहाण केल्यानंतर गोकुळ झा पळून गेला होता. पोलीस त्याचा दोन दिवस तपास करत होते. गोकुळ सापडत नसल्याने कोळसेवाडी पोलिसांनी गोकुळचा भाऊ रणजित झा याला ताब्यात घेऊन अटक केली होती. आपल्या भावाचा या मारहाण प्रकरणाशी काही संबंध नसताना त्याला का पोलिसांनी अटक केली आहे, असा प्रश्न आरोपी गोकुळ झा सातत्याने पोलीस आणि तपास यंत्रणांना करत आहे.
गेल्या आठवड्यात कल्याण न्यायालयात नेत असताना गोकुळ झाने उर्मटपणा करत बुरखा घालण्यास पोलिसांना नकार दिला आणि तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना ‘तुम्ही जे करता ते चूक करता, तुम्हाला बघून घेतो,’ अशी धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणला असल्याची तक्रार केली आहे.
झा कुटुंबीय रणजितचा याप्रकरणात समावेश नसल्याचे सांगत त्याच्या जामिनासाठी प्रयत्न करत आहे. रणजितच्यावतीने कल्याण न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार असल्याचे कळल्यावर पीडित तरूणीने ॲड. हरिश नायर यांच्यातर्फे कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात एक सत्यप्रतिज्ञा पत्र दाखल केले.
या सत्यप्रतिज्ञा पत्राविषयी पीडितेचे वकील ॲड. हरिश नायर यांनी माध्यमांना सांगितले, पीडित तरूणी मंगळवारी न्यायालयात हजर होती. तिने गोकुळचा भाऊ रणजित झा याला न्यायालयाने जामीन मंजूर केला तर त्याच्या पासून आपल्या कुटुंबीयांना घातपात होईल. धोका निर्माण होऊ शकतो. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे तो तपास कामात अडथळे आणून साक्षीदार आणि पंच फितूर करू शकतो. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये, अशी मागणी पीडितेने सत्यप्रतिज्ञा पत्राद्वारे न्यायालयाला केली आहे.
बुधवारी न्यायालयाने रणजित झाला न्यायालयात पोलिसांनी जामिनासाठी हजर केला. तेव्हा न्यायालयाने पीडित तरूणीच्या सत्यप्रतिज्ञाचा विचार केला. तसेच, पीडितेचे वकील ॲड. हरिश नायर यांनी रणजित झाला जामीन दिला तर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. न्यायालयाने ॲड. नायर आणि सहकाऱ्यांनी पीडितेच्या बाजुने केलेला भक्कम युक्तिवाद आणि पीडितेच्या सत्यप्रतिज्ञा पत्राचा विचार केला आणि रणजित झाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे पीडितेला मारहाण करणारा गोकुळ आणि त्याचा रणजित दोघेही सध्या आधारवाडी कारागृहात आहेत.