डोंबिवली – नागरीकरण झालेल्या कल्याण, डोंबिवली शहरांच्या वेशीवरील शीळ रस्त्याचा काही भाग, दिवा-शिळफाटा रस्ता, मलंगगड रस्ता मुसळधार पावसामुळे जलमय झाला आहे. दिवा शीळ रस्त्याला महानदीचे स्वरूप आले आहे. रस्ते जलमय झाल्यामुळे या रस्त्यांवर जागोजागी कोंडी झाली आहे. रस्त्यावर उभी असलेली मोटार, दुचाकी वाहने दिवा शीळ रस्ता भागात वाहून गेली आहेत.
रस्ते जलमय झाल्यामुळे वाहने संथगतीने धावत आहेत. त्यामुळे दिवा शीळ रस्ता, कल्याण शीळफाटा रस्ता, रिजन्सी अनंतम चौक, कल्याण पूर्वेतील मलंगगड आडिवली ते नेवाळी रस्ता भागात जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. कल्याण शीळफाटा रस्त्याची सीमेंट काँक्रीटची बांधणी करताना अनेक ठिकाणी गटारे बांधण्यात आली नाहीत. परिसरातील पाणी आणि रस्त्यालगतचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. शिळफाटा रस्त्यालगतची दुकाने, घरे, बंगले, गाळे जलमय झाले आहेत. या रस्त्यावर टपऱ्या, हातगाड्यांच्या माध्यमातून वस्तू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या हातगाड्या मुसळधार पावसात वाहून गेल्या आहेत.
कल्याण पूर्वेतील मलंगगड नेवाळी रस्त्यावर आडिवली ढोकळी या बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात नाले, गटारे बुजवून बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी मुसळधार पाऊस पडला की या भागातील रस्ते, इमारती, चाळींचा परिसर जलमय होतो. आताही हा रस्ता जलमय झाला आहे.
सर्वाधिक बिकट परिस्थिती दिवा शिळफाटा रस्त्याची झाली आहे. दिवा बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखले जाते. या भागातील भूमाफियांनी नाले, गटारे, रस्ते मार्ग बुजवून मनमानी पध्दतीने दिवा शहरात बेकायदा इमारती उभारल्या आहेत. तगावातील पाणी वाहून जाण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले बुजवले गेल्याने हे पाणी आता इमारतींच्या आडोशाने जागीच तुंबून राहत आहेत. मुसळधार पाऊस सुरू झाला की विविध भागातील पाणी एकत्र येऊन वाट मिळेल तेथे हे पाणी वाहून जाते. हे पाणी आता रुंदीकरण केलेल्या दिवा शिळफाटा रस्त्यावर आले आहे.
या रस्त्या लगतची दुकाने, घरे जलमय झाली आहेत. दुकानातील वस्तू वाचविण्यासाठी दुकानदारांची धडपड सुरू आहे. दिवा शहरात स्वस्तात घर मिळते म्हणून मुंबई परिसरातील नागरिक दिवा, मुंब्रा शहर परिसरात येऊन राहत आहेत. या वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत आवश्यक रस्ते, नागरी सुविधा दिवा शहरात नसल्याने त्याचा फटका मुसळधार पाऊस काही आपत्ती आली की दिवा शहराला बसत आहे. दिवा शहराच्या वेशीवर चार ते पाच एकर भागात कचराभूमी तयार करण्यात आली आहे. या कचराभूमीमुळे दिवा शहरातून मुंब्रा खाडीत वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह खोळंबला आहे.
मुसळधार पावसामुळे कल्याण शिळफाटा रस्त्यावरील सुयोग रिजन्सी अनंतम चौक, सोनारपाडा भागात पाणी तुंबले आहे. जलमय रस्त्यामुळे वाहने संथगतीने धावत आहेत तर काही ठिकाणी वाहने थांबली आहेत. कोंडी टाळण्यासाठी प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. – सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, कोळसेवाडी.