नव्या जलस्रोतासाठी महापालिकेचे प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरांची वाढती लोकसंख्या, या लोकसंख्येची भविष्यातील पाण्याची वाढती गरज ओळखून येत्या काळात मलंगगड खोऱ्यातील कुशीवली धरण विकसित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. तसेच रायगड जिल्ह्यातील पोशीर, कोंढाणे धरण पालिकेला नवीन जलस्रोत म्हणून स्वतंत्रपणे विकसित करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, अशी मागणी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. कुशीवली धरणामधून कल्याण डोंबिवली शहरांसह २७ गाव परिसराला वाढीव आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा होईल या दृष्टीने नियोजन करावे. कुशीवली धरणाच्या नवीन बांधकाम आराखडय़ात या धरणाची उंची वाढविली तर मुबलक पाणीसाठा धरणात उपलब्ध होईल. या दोन्ही शहरांसह २७ गाव परिसराला पाणी उपलब्ध होऊन एक नवीन स्रोत कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रासाठी उपलब्ध होईल, असे आयुक्तांनी शासनाला सुचविले आहे.

नागरीकरण, वाढत्या उद्योग व्यवसायांचा विचार करता उपलब्ध पाणीसाठा पालिका हद्दीला पुरेसा नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरांसाठी नवीन जलस्रोत तयार करणे गरजेचे आहे, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणले आहे. २०३१ मध्ये कल्याण डोंबिवलीची संभाव्य लोकसंख्या ३२ लाख २७ हजार असेल. या लोकसंख्येसाठी दररोज ५०१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. २०४१ मध्ये या शहरांची लोकसंख्या ४७ लाख असेल. या लोकसंख्येसाठी दररोज ७३० दशलक्ष लिटर पाणीसाठय़ाची गरज आहे. भविष्यातील संभाव्य वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन सध्याचे जलस्रोत येत्या काळात अपुरे पडणार आहेत. त्यामुळे नवीन जलस्रोत विकसित होणे आवश्यक आहे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

नवी मुंबई पालिकेला मोरबे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नवी मुंबई पालिकेला बारवी धरणातून होणारा १४० दशलक्ष लिटर दररोजचा पाणीसाठा कल्याण डोंबिवली पालिकेकडे वर्ग करण्याचा निर्णय १३ वर्षांपूर्वी जलसंपदा विभाग, एमआयडीसी, कडोंमपा अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला आहे. तरीही एमआयडीसीकडून नवी मुंबईच्या साठय़ातील उल्हास नदीवरून होणारा १४० दशलक्ष लिटर पाणीसाठा कल्याण डोंबिवली पालिकेकडे वर्ग करण्यात आला नाही. हा पाणीसाठा कल्याण डोंबिवलीला वर्ग करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालिकेने केली आहे. कल्याण डोंबिवली पालिका स्वत:चा स्वतंत्र जलस्रोत शोधत आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील पोशीर, कोंढाणे धरण यापैकी एक धरण विकसित करून तो जलस्रोत दोन्ही शहरांना पूर्ण क्षमतेने वापरण्यास मिळेल या दृष्टीने शासनाने सहकार्य करावे व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्तांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. या महत्त्वपूर्ण विषयावर तातडीने बैठका घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी पालिकेतर्फे शासनाकडे करण्यात आली आहे.

४१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

काळू नदीतून टिटवाळा भागासाठी दररोज चार दशलक्ष लिटर पाणीसाठा, उल्हास नदीतून दररोज ३२० दशलक्ष लिटर पाणी उचलण्याची परवानगी कल्याण डोंबिवली पालिकेला आहे. या दोन्ही नद्यांमधून पालिका दररोज सुमारे ३६० दशलक्ष लिटर पाणी उचलून पालिका हद्दीत वितरित करते. २७ गावांसाठी एमआयडीसी प्रतिदिन ५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. अशा प्रकारे पालिका हद्दीला विविध स्रोतांमधून दररोज ४१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivali hopes kushiwali dam ysh
First published on: 01-02-2022 at 00:44 IST