कल्याण : ३१ जुलैपूर्वी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर धारकांनी मालमत्ता कर भरणा केला तर त्या मालमत्ता कर धारकाला मालमत्ता करात पाच टक्के सवलत (रिबेट) मिळते. ऑनलाईन भरणा करणाऱ्याला दोन टक्के सवलत मिळते. ही सवलत मिळविण्याची मुदत गुरूवारी समाप्त झाली. त्यामुळे पालिकेने मालमत्ता कर धारकांच्या सूचनांचा विचार करून ही मुदत आणखी एक महिना म्हणजे ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर धारकांना अधिक प्रमाणात या पाच टक्के सवलतीचा लाभ मिळावा. तसेच, पालिकेच्या तिजोरीत अधिकचा कर भरणा व्हावा या उद्देशातून प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीही अशाच पध्दतीने एक महिना कर भरणा करण्याची मुदत वाढवली होती. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून मालमत्ता धारकाला वर्षाचे मालमत्ता कराचे देयक पाठविले होते. हे मालमत्ता कर देयक धारकाने एक रकमी किंवा दोन टप्प्यात भरण्याची मुदत पालिकेने दिली आहे.
पालिकेने दिलेल्या निर्धारित वेळेत ग्राहकाने मालमत्ता कर भरणा केला की ग्राहकाला त्याच्या मालमत्ता करात पाच टक्के सवलत मिळते. ही सवलत आगामी वर्षाच्या मालमत्ता कर धारकाच्या मालमत्ता करात समायोजित करून पालिका त्या ग्राहकाला त्याने घेतलेल्या सवलतीचा लाभ देते.काही मालमत्ता कर धारक आपले मालमत्ता कर देयक ऑनलाईन माध्यमातून भरणा करतात. त्या ग्राहकांना पालिका प्रशासन दोन टक्के सवलतीचा लाभ देते. मालमत्ता कर भरणा करणाऱ्या ग्राहकांना काही वेळा घरगुती अडचणी, कार्यालयीन वेळेमुळे किंवा बाहेर गावी कार्यालयीन कामासाठी गेल्याने किंवा अन्य अडचणीमुळे कर भरणा वेळेत भरणा करता येत नाही. काही वेळा तांत्रिक अडचणी असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून पालिका प्रशासनाने ग्राहकांना अधिक प्रमाणात पाच टक्के आणि दोन टक्के सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी ३१ जुलैची संपलेली मुदत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मालमत्ता कर देयक भरणा करणाऱ्या नागरिकांना आपल्या घर परिसरात मालमत्ता कर भरणा आणि पाणी देयक भरणा केंद्रे असावीत म्हणून पालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी प्रत्येक प्रभागात किमान दोन अशाप्रकारे दहा प्रभाग क्षेत्रांमध्ये एकूण अठरा विशेष नवीन मालमत्ता कर भरणा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.