मागील तीन दिवसांपासून कडक उन्हामुळे होरपळून निघालेल्या कल्याण-डोंबिवलीतील तापमानाने आज (गुरुवार) नाव उच्चांक केला. कल्याणमध्ये आज ४३ अंश सेल्सियस, डोंबिवलीत ४२.८ अंश सेल्सियस विक्रमी तापमानाची नोंद झाली. पाच वर्षांपूर्वी २०१७ नंतरचे हे कल्याण डोंबिवलीतील सर्वाधिक तापमान आहे. कल्याण डोंबिवलीत आज विदर्भातील उन्हाळ्याप्रमाणे चटके बसत होते.

हवामान खात्याने मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्याला दिलेल्या उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यानूसार कल्याण डोंबिवलीमध्येही तापमानाचा पारा चढ़ा दिसत आहे. उकाड्याचा आजचा लागोपाठ चौथा दिवस असून मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान आज नोंदवण्यात आले. यापूर्वी २७ मार्च २०१७ मध्ये कल्याणमध्ये ४३ अंश सेल्सियसची नोंद झाली होती. दोन वर्षांनी म्हणजेच २०१९ मध्येही ४१ ते ४२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

कल्याणप्रमाणे डोंबिवलीतही यंदाच्या मोसमातील सर्वाधिक म्हणजेच ४२.८ अंश सेल्सियस चढ्या तापमानाची नोंद झाली. ही तापमान वाढ म्हणजे उष्णतेच्या लाटेचाचा परिणाम असून विदर्भात ज्याप्रमाणे कडक ऊन असूनही घाम येत नाही. अगदी तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवलीच्या तुलनेत कमी शहरीकरण झालेल्या बदलापूरमध्येही आज गेल्या १० वर्षांतील उच्चांकी असे ४२.९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेल्याचे त्यांनी सांगितले.

१८ मार्चपासून तापमान हळूहळू कमी होणार –

मागील चार दिवस दररोज एक ते दिड अंश सेल्सियस या प्रमाणात हे तापमान जसे वाढत गेले. अगदी त्याचप्रमाणे उद्यापासून (शुक्रवार १८ मार्चपासून) हळूहळू हे तापमान कमी होऊ लागेल अशी महत्वाची माहितीही मोडक यांनी दिली. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत हे तापमान कमी म्हणजे ३७ ते ३८ अंश सेल्सियसपर्यंत राहण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महत्वाच्या शहरातील तापमान अंश सेल्सियसमध्ये –

कल्याण – 43, डोंबिवली – 42.8, बदलापूर – 42.9, उल्हासनगर – 42.8, ठाणे – 42.5, भिवंडी – 43, नवी मुंबई – 42.3, कर्जत – 44.5