कल्याण – १ ऑक्टोबर कल्याण डोंबिवली पालिकेचा वर्धापन दिन. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अशाच एका कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी व्यासपीठावर आपल्या सहकाऱ्यांसोबत नाचले. या नृत्याच्या दृश्यध्वनी चित्रफिती सर्वदूर समाज माध्यमांतून पसरल्या. असेच काही कल्याण डोंबिवली पालिकेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात होऊ शकते…यासंदर्भातचे संदेश काही जाणकार मंडळीनी पालिकेच्या वरिष्ठांना पाठविले. आणि कल्याण डोंबिवली पालिकेचा १ ऑक्टोबर रोजी नेहमीच वाजत गाजत होणारा वर्धापनदिन सोहळा यावेळी वादच नको म्हणून रद्द झाला.

वर्धापनदिन सोहळ्यासाठी निधी प्रस्तावित असतो. अनेकांना त्याची हुरहर असते. वर्धापनदिन कार्यक्रमच झाला नाहीतर मग या निधी आणि खर्चाचे काय, अशी चुळबुळ काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची होती. कल्याण डोंबिवली पालिकेतील सुमारे दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सामान्य प्रशासन अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त वंदना गुळवे आणि वरिष्ठ लिपिक शशी महाले यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे पदोन्नत्ती मिळाली आहे.

पालिका सेवेत २५ ते ३० वर्ष सेवा केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना अनेक वर्षानंतर प्रथमच पदोन्नत्ती मिळाल्याने अनेक कर्मचारी, अधिकारी आनंद उत्साहात आहेत. तर काही कर्मचाऱ्यांवर या पदोन्नत्ती प्रकरणात अन्याय झाल्याने ते नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी तक्रारी आणि संदेशाच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत पोहचवली आहे.

वर्धापनदिन तर झालाच पाहिजे यासाठी आग्रही असलेल्या अधिकाऱ्यांंनी मग पदोन्नत्ती झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा गुणगौरव करण्याचे निमित्त साधून पालिका वर्धापनदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात या कार्यक्रमाचे संध्याकाळी आयोजन केले होते. पदोन्नत्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांसह सर्व पालिका कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. उत्सवमूर्ती कर्मचारी हा कार्यक्रम दणक्यात होईल यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत होते. आयुक्तांसह इतर अधिकारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते.

परंतु, कार्यक्रमाची वेळ टळून गेली तरी अत्रे रंगमंदिरातील बहुतांशी खुर्च्या रिकाम्याच. सभागृह कर्मचाऱ्यांनी भरण्याची सुतराम शक्यता नव्हती. दरम्यानच्या काळात समाज माध्यमांवर पदोन्नत्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी किती महसूल वाढविला. खराब रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडीने जर्जर झालेल्या लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काय दिवे लावले. पालिकेत एक तरी कर्तव्यदक्ष कर्मचारी दाखवा आणि एक हजार रूपये बक्षिस मिळवा, असे समाज माध्यमी संदेश फिरू लागले.

वर्धापनदिन कार्यक्रमा अगोदरच वर्धापनदिन सोहळा टिकेचे लक्ष्य होऊ लागला हे निदर्शनास आल्यावर आणि सभागृहातील कर्मचाऱ्यांची तुरळक उपस्थिती पाहून अखेर अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आयुक्तांना पंतप्रधान दौऱ्यानिमित्त महत्वाची बैठक असल्याने ते या सोहळ्याला येऊ शकणार नाहीत. घाईने हा सोहळा उरकणे योग्य नाही. त्यामुळे हा सोहळा नंतर घेण्यात येईल असे जाहीर केले. आणि त्याच बरोबर पालिका कर्मचाऱ्यांचा हा सोहळा असताना कर्मचाऱ्यांची तुरळक उपस्थिती ही खेदजनक असल्याची खंत गायकवाड यांनी जाहीरपणे व्यक्त करून दाखवली.

पदोन्नत्ती मिळालेले आयुक्तांच्या हस्ते सत्कार होणार म्हणून उपस्थित असलेले तुरळक कर्मचारी हिरमोड होऊन सभागृहा बाहेर पडले.