कल्याण – डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथील साडे चार वर्षाची बालिका आणि तिची २४ वर्षाची मावशी यांना मण्यार जातीचा साप चावला. या सापावरील उपचाराची इंजेक्शन तीन कोटीचा अर्थसंकल्प असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नव्हती. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या दोन जणींचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही तर आपण शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळे ठोकल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
प्राणवी भोईर आणि तिची मावशी श्रृती ठाकूर (२४) यांचा दोन दिवसात साप चावून मृत्यू झाला आहे. शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कार्य पद्धतीमुळे या दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मंगळवारी सकाळपासून पालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना फैलावर घेतले.
आधारवाडी येथील आरोग्य मुख्यालयात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांच्या दालनात सत्यवान म्हात्रे, भालचंद्र पाटील आणि इतरांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. पहिले दोषींवर गुन्हा सदोष मनुष्यवधाचा गु्न्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी ते करत होते.
मृतकांचे नातेवाईक संतप्त झाल्याने आरोग्य मुख्यालयात तणावाचे वातावरण होते. आरोग्य विभागाचे प्रमुुख अधिकारी सतत निरोप देऊनही मृतकांच्या नातेवाईकांशी चर्चा करण्यासाठी फिरकले नाहीत. डॉ. शुक्ला यांनीच परिस्थिती हाताळली. शास्त्रीनगर रुग्णालयाचा अनुभव असलेली एक महिला डॉक्टर मुख्यालयात असूनही बाजूला शांतपणे बसल्या होत्या.
डाॅ. शुक्ला यांनी या दोघींच्या मृत्यु प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन सत्यवान म्हात्रे, भालचंद्र पाटील आणि इतरांना दिले. त्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन काही काळासाठी स्थगित केले.
लग्नाआधीच काळ
खंबाळपाडा येथील श्रृती ठाकुर हिचा नुकताच साखर पुडा झाला होता. तिचे पुढील महिन्यात लग्न होणार होते. घरात लग्नाची धावपळ सुरू असताना श्रृतीला साप चावला. तिचे निधन झाल्याने कुटुंबिय हळहळले आहेत.
औषध पुरवठा द्या
राज्याच्या विविध भागात दरवर्षी शेतकरी, नागरिक, आदिवासी दुर्गम भागातील सामान्य साप चावून मृत्यू पावतात. साप चावलेला रुग्ण शासकीय, पालिका रुग्णालयात नेला की मग डाॅक्टरांची त्या उपचारावरील लस, इंजेक्शनचा शोध सुरू करतात. तोपर्यंत शासकीय, पालिका रुग्णालयात ती औषधे नसतात. त्यामुळे साप चावण्यावरील लसी, इंजेक्शने वेळेत पालिका, शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील. साप चावलेल्या रुग्णावर वेळेत उपचार होऊन तो बरा होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात साप चावलेली एक बालिका, एका महिलेवर वेळीच योग्य उपचार न झाल्याने त्यांचे मृत्यू झालेत हा विषय कल्याणमधील माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून निदर्शनास आणला आहे. पालिका रुग्णालये, आरोग्य केंंद्रांवर कोणाचाही वचक राहिला नसल्याने शासनाने याठिकाणी कठोर शिस्तीचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याची मागणी माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी केली आहे.